लोकमत न्यूज नेटवर्कपारोळ : महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक असून, रोज मृत्यूही वाढत आहेत. यामुळे महाराष्ट्रात परिस्थिती चिंताजनक बनली असल्याचे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी श्रमजीवी कोविड सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी सांगितले. आता सुरू असलेली कोरोनाची लाट ही भयंकर असून, कुटुंबेच्या कुटुंबे संक्रमित होत आहेत. सर्व वयोगटातील व्यक्तींना याची लागण होत असून, यात तरुणांचेही बळी जात आहेत. या संक्रमणामुळे आपली आरोग्य व्यवस्था कुठे तरी कमी पडत असल्याचेही ते म्हणाले.
या कठीण परिस्थितीत रुग्णांचे आरोग्य सांभाळणारे डॉक्टर, नर्स यांचे आभार मानत कोरोनाबाबत केंद्र सरकारने महाराष्ट्राला सर्वाधिक १८०० टन ऑक्सिजन साठा दिला असून, रेमडेसिविर मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिले आहे. पण, या दिलेल्या बाबींचे नियोजनपूर्ण वाटप करणे महत्त्वाचे असून, पालघर जिल्ह्यासारख्या आदिवासी जिल्ह्यातसुद्धा त्यांना अनाथासारखी वागणूक न देता रुग्णसंख्येप्रमाणे ऑक्सिजन व रेमडेसिविरचा साठा उपलब्ध करून द्यायला हवा, असे ते म्हणाले. याप्रसंगी विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आ. मनीषा चौधरी, विवेक पंडित आदी मान्यवर उपस्थित होते. श्रमजीवी कोविड सेंटर हे वसई पूर्व भागात उसगाव येथे १०० खाटांचे सुरू केलेले पहिले कोविड सेंटर असून, यात २० ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था आहे. या कोविड सेंटरमुळे ग्रामीण नागरिकांना याचा मोठा फायदा होणार असून, जर कोरोनाची लागण झाली तर या भागातील नागरिकांना वसई, विरार, नालासोपारा किंवा विक्रमगड या ठिकाणी जावे लागे. हे कोविड सेंटर निसर्गाच्या सान्निध्यात असल्याने रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे.