कोट : जळगाव शहर हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने, इतर सर्व तालुक्यांचा थेट संबंध जळगावसोबत असतो. त्यामुळे तेथे नागरिकांची ये-जा असते. त्यामुळे जिल्ह्याच्या तुलनेत शहरात जास्त कोरोना रुग्ण आढळून येत आहे. हे प्रमाण २० ते २५ टक्के एवढे आहे. मात्र, राज्यातील इतर जिल्ह्यात हेच प्रमाण ४० टक्के एवढे आहे. सध्या कोरोना रुग्णांची संख्या ही स्थिर असली, तरी लवकरच ही संख्या कमी व्हायला सुरुवात होईल.
- सतीश कुलकर्णी, आयुक्त, जळगाव शहर महापालिका
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगाव शहरात सध्या कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. हे प्रमाण स्थिर झाले आहे. मात्र, आता शहरात १५ दिवसांची संचार बंदी पाळली जाणे आणि अत्यावश्यक बाबींच्या खरेदीसाठी होणारी गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्यात शहरातील मुख्य भाजी बाजाराचे विकेंद्रीकरण केले जात असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त डॉ.सतीश कुलकर्णी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
प्रश्न : जिल्ह्यातील इतर कोणत्याही तालुक्याच्या तुलनेत शहरात जास्त रुग्ण आढळतात. त्यावर काय सांगाल?
आयुक्त कुलकर्णी : कोविड सुरू झाल्यापासून एक बाब समोर आली आहे. जिल्ह्यात आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येच्या सामान्यत: २० ते २५ टक्के रुग्ण हे जळगाव शहरात आढळून येतात. जिल्ह्याच्या ठिकाणाशी सर्वांचा असणारा संपर्काने हे होते. काही दिवसांपूर्वी जेव्हा जिल्ह्यात १,२००च्या जवळपास रुग्ण येत होते. तेव्हा जळगाव शहरात ३००च्या आसपास रुग्णसंख्या होती. मात्र, हा चढता आलेख आता संपला आहे. आता रुग्णसंख्या स्थिर झाली आहे. लवकरच ती कमी होईल.
प्रश्न : संचारबंदीचे पालन व्हावे आणि गर्दी होऊ नये, यासाठी महापालिकेतर्फे कोणत्या उपाययोजना केल्या आहेत.
आयुक्त सतीश कुलकर्णी : राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. गर्दी कमी व्हावी, यासाठी शहरातील मुख्य भाजी बाजार सुभाष चौक ते घाणेकर चौक, भिलपुरा पोलीस चौकी या भागातील विक्रेत्यांना शहरातील इतर भागात हलविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मुख्य बाजारात एकत्र होणारी गर्दी टळेल आणि नागरिकांनाही घराच्या जवळच भाजी व इतर वस्तू मिळतील. अतिक्रमण विरोधी पथकात उपायुक्त संतोष वाहुळे यांच्यासोबत आता सहा पथके स्थापन करण्यात आली आहे. त्यात सार्वजनिक बांधकाम विभागातील सहा अभियंत्यांचा समावेश करण्यात आला आहे. पथकासोबतच पोलीस कर्मचारीही असतील.
प्रश्न : मनपाच्या टेस्टिंग सेंटरवर केल्या जाणाऱ्या आरटीपीसीआर चाचण्यांचे अहवाल उशिराने येतात, अशी वारंवार तक्रार केली जाते?
आयुक्त सतीश कुलकर्णी : मनपाकडे फक्त सॅम्पल घेतले जातात. त्याची तपासणी ही जिल्हा रुग्णालयातील लॅबमध्ये होते. तेथे क्षमतेपेक्षा जास्त सॅम्पल आले की, ते खासगी लॅबकडेही पाठविले जातात. काही वेळा त्यात उशीर होऊ शकतो. सध्या रात्री विनाकारण फिरणाऱ्यांची चाचणी केली जात आहे. त्यासोबतच शहरातील जे भाग कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत. तेथेही नागरिकांच्या चाचण्या केल्या जात आहेत. हायरिस्क आणि लो रिस्क कॉन्टॅक्टच्या चाचण्यांवरही भर दिला आहे. मनपाकडे पुरेसे अँटिजन किट आहेत. हे काम १० नागरी आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून होत आहे. औद्योगिक वसाहतीतील कामगारांच्या चाचण्या करणे बंधनकारक आहे. त्यासाठी डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांची भरतीही केली जात आहे.
प्रश्न : सध्या संचारबंदी आहे. त्यामुळे मान्सूनपूर्व कामे कशा पद्धतीने केली जात आहेत?
आयुक्त सतीश कुलकर्णी : मान्सूनपूर्व कामे करण्यास शासनाने मुभा दिली आहे. त्यामुळे शहरात भुयारी गटारे, अमृत योजना, रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम पाइपलाइनची काही कामे सुरू आहेत, तसेच सोमवारपासून नालेसफाईलाही सुरुवात होणार आहे.