अजय पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गणेशोत्सव अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपला असताना मूर्तिकामावर यंदाही कोरोनाचे सावट आहे. मूर्तिकारांना एकीकडे कोरोना निर्बंधांमुळे हातावर हात ठेवून बसावे लागले आहे, तर दुसरीकडे कोरोनाचे विघ्न कधी संपेल? याचीच प्रतीक्षा मूर्तिकार करत आहेत. त्यातच राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे घालून दिलेल्या नव्या नियमावलीमुळेदेखील मूर्तिकार अडचणीत आले असून, ४ फुटांपेक्षा उंचीच्या मूर्ती यावर्षीही पडूनच राहणार असल्याने मूर्तिकारांवर मोठे आर्थिक विघ्न आले असून, विघ्नहर्त्याकडे विघ्न हरण्याची प्रार्थना मूर्तिकार करत आहेत.
यावर्षी १० सप्टेंबरला लाडक्या बाप्पाचे आगमन होत आहे. त्याआधी कोरोना संसर्गाची परिस्थिती आटोक्यात येत आहे. त्यामुळे गणेशोत्सवात पारंपरिक उत्साह संचारण्याची आशा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना होती. मात्र, कोरोना निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर सरकारने गणरायाच्या मूर्तिकामासाठी नवीन नियमावली जारी केली आहे. त्यामुळे मूर्तिकार पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. मूर्तिकार गणेशोत्सवासाठी मूर्ती तयार करण्याचे काम साधारणपणे मार्च महिन्यापासूनच सुरू करत असतात. जळगाव शहरात पश्चिम बंगाल, राजस्थान, मध्यप्रदेश व गुजरात येथील मूर्तिकार दाखल होत असतात. यासह शहरातदेखील स्थानिक मूर्तिकारदेखील मोठ्या प्रमाणात मूर्ती तयार करत असतात. मात्र, गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही या मूर्तिकारांवर अडचणींचे विघ्न निर्माण झाले आहे.
गणेशोत्सवासाठीच्या काय आहेत
मार्गदर्शक सूचना
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यंदाचा गणेशोत्सवही साधेपणाने साजरा करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना राज्य शासनाने नुकत्याच जारी केल्या. यंदाही गणरायाची प्रतिष्ठापना, तसेच विसर्जनाच्या मिरवणुकांना बंदी असेल. सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करता येणार नाही. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मूर्ती ४ फूट आणि घरगुती गणपतीची मूर्ती २ फुटांपेक्षा अधिक उंच असू नये, असे आदेश आहेत. कोरोनासंदर्भात जिल्हा प्रशासनाने लागू केलेल्या निर्बंधांमध्ये गणेशोत्सव काळात कोणतीही सूट दिली जाणार नाही. गेल्यावर्षीही गणेशमूर्तींच्या उंचीबाबत मर्यादा होती. गणेशोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रम, रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
गेल्या वर्षीच्या मूर्ती पडून
शहरातील कालंका माता चौक परिसरात राजस्थानहून आलेल्या मूर्तिकारांनी गेल्यावर्षी तयार केलेल्या मूर्ती अजूनही पडून आहेत. राजस्थानहून आलेले ललित राठोड सांगतात की, गेल्यावर्षी १० फुटांपर्यंतच्या मूर्ती तयार केल्या होत्या. मात्र, कोरोनाच्या नियमांमुळे या मूर्ती पडून आहेत. यावर्षीही नवीन नियमावली जाहीर झाली आहे. यामुळे या मूर्तींची विक्री होणे कठीण आहे. अशा परिस्थितीत आर्थिक नुकसानाव्यतिरिक्त दुसरा मार्ग नाही.
सार्वजनिक मंडळाकडूनही
स्थापना झाल्या कमी
शहरात कोरोनाआधी सुमारे २०० हून अधिक सार्वजनिक गणेश मंडळांकडून गणपतीची स्थापना होत होती. मात्र, गेल्यावर्षी केवळ ८९ सार्वजनिक गणेश मंडळांकडून गणेशाची स्थापना करण्यात आली, तसेच घरगुती गणेशाची स्थापनादेखील काहीअंशी कमी झाली होती. यावर्षी त्यात आणखीन घट होण्याची शक्यता आहे.
कोट..
कोरोनामुळे गणेशोत्सवावर मोठा परिणाम झाला असून, शासनाने तयार केलेल्या नियमांमुळे सर्वाधिक फटका हा मूर्तिकारांनाच बसणार आहे. मूर्ती तयार करण्याचे काम अनेक महिन्यांपासून सुरू होते. शासनाने आता नियमावली तयार केली. आता तयार झालेल्या मूर्तींचे काय करावे, कच्च्या मालाचे भाव वाढले आहेत. मजूर मिळणे कठीण, अशा परिस्थितीत मूर्ती तयार केल्या. मात्र, शासनाच्या नियमांमुळे नुकसान होणार आहे.
-सुमित बागची, मूर्तिकार, अजिंठा चौक परिसर