दिरंगाई : दोन वर्षात जळगाव ते शिरसोली पर्यंतच्या पहिल्या टप्प्याचेही काम पूर्ण नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगाव ते मनमाडदरम्यान तिसऱ्या रेल्वेमार्गाचे काम हाती घेतल्यानंतर, जळगाव ते शिरसोलीपर्यंतचा पहिला टप्पा वर्षभरात पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र, कोरोनामुळे हे काम गेल्या वर्षी काही महिने बंद होते. तर सध्या कमी मजुरांअभावी हे काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे कोरोनाचा या कामाला चांगलाच अडथळा येत आहे. दोन वर्षांत या कामाचा शिरसोलीपर्यंतचा पहिला टप्प्याही पूर्ण झाला नसल्याचे ‘लोकमत’ प्रतिनिधीने केलेल्या पाहणीतून समोर आले आहे.
रेल्वे बोर्डाने भुसावळ ते मनमाडदरम्यान तिसरा रेल्वेमार्ग उभारण्याच्या कामाला मंजुरी दिल्यानंतर, भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे सुरुवातीला भुसावळ ते भादली व भादली ते जळगावदरम्यान तिसरा रेल्वेमार्ग उभारण्याच्या कामाला प्रथम प्राधान्य दिले. यात दोन वर्षांपूर्वी भुसावळ ते भादलीदरम्यान बहुतांश काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने १ मे २०१९ रोजी पिंप्राळा रेल्वेगेटपासून जळगाव ते मनमाडदरम्यान तिसऱ्या रेल्वेमार्गाचा श्रीगणेशा केला होता. यात पहिला टप्पा जळगाव ते शिरसोलीदरम्यानचा ठरवून, वर्षभरात हे काम पूर्ण करण्यात येणार होते.
सहा महिन्यांतच सपाटीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले होते. त्यानंतर रूळ टाकण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार होती. मात्र, गेल्या वर्षी मार्च २०२० मध्ये कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर सात ते आठ महिने हे काम बंद होते.
इन्फो :
कोरोनामुळे दोन वेळा काम रखडले
१) तिसऱ्या रेल्वेमार्गातील शिरसोलीपर्यंतच्या पहिल्या टप्प्याचे काम १ मे २०१९ रोजी सुरू केले होते. भुसावळमधीलच एका खासगी मक्तेदाराकडून रेल्वे अधिकारी काम करून घेत आहेत. मे महिन्यात या कामाला सुरुवात झाल्यानंतर डिसेंबरपर्यंत बहुतांश ठिकाणी सपाटीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले.
२) ज्या ठिकाणी भूसंपादनाचा योग्य मोबदला न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी जमिनी दिलेल्या नाहीत. त्या ठिकाणी सपाटीकरण करण्यात आलेले नाही. डिसेंबर २०१९ पर्यंत बऱ्याच ठिकाणी सपाटीकरणाचे काम झाल्यानंतर रेल्वे प्रशासनातर्फे लोखंडी रूळ टाकण्यासाठी जागेचे मोजमाप व तांत्रिक बाबींची पूर्तता केली.
३) मार्च २०२० मध्ये रेल्वे प्रशासनातर्फे या मार्गावर रुळ टाकण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार होती. मात्र, मार्चमध्येच कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यातही आल्यानंतर हे काम बंद पडले. कामावरील सर्व परराज्यांतील मजूर गावाकडे परतले. त्यामुळे हे काम गेल्या वर्षी दिवाळीपर्यंत बंदच होते.
४) नोव्हेंबरपासून या ठिकाणी रूळ टाकण्याच्या कामाला पुन्हा सुरुवात झाली. गेल्या महिन्यात मार्चपर्यंत या ठिकाणी फक्त रूळ टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे; तर विद्युत खांब व इतर तांत्रिक काम रखडले आहे.
इन्फो :
... तर आणखी चार महिने लागणार
‘लोकमत’च्या प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत या ठिकाणी रूळ टाकण्याचे काम पूर्ण झाले असून, आता रेल्वे कर्मचाऱ्यांमार्फत रुळांमध्ये खडी टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, विद्युत खांब उभारणे, विद्युतीकरण करणे, सिग्नल यंत्रणा बसविणे, त्यानंतर रेल्वे इंजिन चालवून या मार्गाची चाचणी घेणे व इतर तांत्रिक बरीच कामे बाकी आहेत. त्यामुळे हे सर्व काम पूर्ण होण्यासाठी किमान चार महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
इन्फो :
कोरोनामुळे तिसऱ्या रेल्वेमार्गाच्या कामाला विलंब होत आहे. मात्र, तरीदेखील लवकरात लवकर शिरसोलीपर्यंतचा पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.
- पंकज ढावरे, उपमुख्य अभियंता, भुसावळ रेल्वे विभाग.