उत्तम काळेभुसावळ, जि.जळगाव : शहरात गेल्या चार ते पाच दिवसापासून पॉझिटिव रुग्णांची संख्या आठ झाली आहे. यातील दोन रुग्ण मयत झाले असून, सहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे शहरवासीयांना विशेष दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे.दरम्यान, याच काळात रेशनिंग दुकानांवर धान्य उपलब्ध झाले आहे. त्यामुळे धान्य घेण्यासाठी नागरिक बाहेर पडत असले, तरी हे धान्य वाटप तब्बल १० दिवस सुरू राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी गर्दी करू नये, असे मत जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.शहरातील समता नगर, आंबेडकर नगर, पंचशील नगर, सिंधी कॉलनी व शांतीनगर या भागात तब्बल आठ रुग्ण पॉझिटिव्ह सापडले. यातील पंचशील नगर व आंबेडकर नगरमधील प्रत्येकी एक - एक रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मात्र तरीही शहरात सहा रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे शहरातील हा परिसर सील करण्यात आला आहे. कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी राज्यासह शहरात लॉकडाऊन सुरू करण्यात आले आहे. सुरवातीचे चार-पाच दिवस वगळता शहरात सर्वत्र भाजी मार्केट, दुकाने आदींमध्ये गर्दी दिसून आली. यावेळी १४४ कलमाचे उल्लंघन केल्यामुळे पोलिसांनी १८८ प्रमाणे अनेकांवर गुन्हे दाखल केले. मात्र तरीही गर्दी आटोक्यात आणण्यात पोलिसांना अपेक्षित यश आले नाही. त्यात कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यावरसुद्धा शहरातील नागरिक रस्त्यावर येणे थांबले नाही. त्यामुळे शहरात तीन दिवस बंद पाळावे, अशी गरज निर्माण झाली व तसा मतप्रवाह पुढे आला. मात्र यातही शहरात राजकारण झाल्यामुळे शहरवासीय संभ्रमात पडले.दरम्यान , याच काळात रास्त भाव दुकानावर शासनातर्फे प्रथमत: गुलाबी रेशनिंग कार्डवर गहू व तांदूळ वाटप सुरू झाले. मात्र हे वाटप किमान दहा-दहा दिवस तर सुरु राहणार आहे. मात्र त्यानंतरही राहिलेल्या ग्राहकांना लाभार्थ्यांना द्यावे लागणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र तरीही शहरात हे रेशनिंग मिळते किंवा नाही, असा संभ्रम निर्माण झाल्यामुळे काही नागरिक जीव धोक्यात टाकून रेशन धान्यासाठी रस्त्यावर उतरले.धान्य साठ्या यासंदर्भात पुरवठा अधिकारी अनभिन्नशहरात रेशनिंगची १२० दुकाने आहेत. या दुकानवर भगव्या रेशन कार्डावर वाटप करण्यासाठी गहू व तांदूळ आला आहे. मात्र गोडावूनमध्ये गहू व तांदूळ किती आला, यासंदर्भात तहसीलदार दीपक धिवरे व पुरवठा अधिकारी अतुल नागरगोजे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांना त्यासंदर्भात माहिती नसल्याचे सांगण्यात आले . तहसीलदार व पुरवठा अधिकारी यांना धान्य वाटप किती करायचे हे माहीत नसल्यामुळे नागरिक चकीत झाले आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात गोडाऊनमधूनच जाणाऱ्या थैल्या कमी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यासंदर्भात जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे यांनी तक्रारी केली होती. त्यावरून पुरवठा विभाग वादात सापडला आहे. त्यात अद्यापही पुरवठा अधिकारी अतुल नागरगोजे यांना धान्यासंदर्भात माहिती नसल्यामुळे जिल्हा परिषद सदस्या सावकारे यांच्या तक्रारींमध्ये दम असल्याचे दिसून येत आहे.
भुसावळात कोरोनाचा कहर, गर्दी टाळण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2020 10:22 PM