जळगाव : कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले असतातना जळगावातही त्याचे गंभीर स्वरूप पाहायला मिळाले आहे... अशा या नैराश्याच्या वातावरणात कुठेही मागे न राहता, महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढा दिला आहे...त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कोरोना चाचणी लॅब होय...लॅबच्या प्रमुख डॉ. शुभांगी डांगे यांच्यासह सूक्ष्मजीव शास्त्र विभागाच्या ८ महिला रिपोर्ट लवकर मिळविण्यासाठी कुठलीही सुटी न घेता लॅबमध्ये अविरत कार्यरत आहेत.
२३ मे पासून कोरोना चाचणीची पहिली लॅब जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुरू झाली. सूक्ष्मजीव शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. किशोर इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाच्या सहयोगी प्रा. डॉ. शुभांगी डांगे या प्रमुख म्हणून लॅबची जबाबदारी सांभाळत आहेत. या लॅबमध्ये सॅम्पलिंग ते रिपोर्टींग अशा विविध टप्प्यांचा प्रवास आहे. अहवाल वेळेवर मिळावा हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून एक दिवसही ही लॅब बंद नसल्याचे डॉ. डांगे यांनी सांगितले.
कुटुंब सांभाळून सेवा
लॅब ही सद्य:स्थितीत सर्वात महत्त्वाची यंत्रणा आहे. त्यामुळे सर्व जण डोळ्यात तेल ओतून सतत या ठिकाणी कार्यरत असतात. महिलावर्ग त्यांची कौटुंबिक जबाबदारी सांभाळून हे कर्तव्य पार पाडत आहे. हे विशेष..नैतिक, सामाजिक अशा दोनही जबाबदाऱ्या या ठिकाणच्या महिला पूर्ण मनाने, शिवाय अनेक अडचणींवर मात करीत पार पाडत आहेत, असे डॉ. शुभांगी डांगे यांनी सांगितले.
या आठ रणरागिणी कार्यरत
सहायक प्रा. डॉ. प्रियंका पाटील, डॉ. प्रियंका शर्मा, सुनीता मुदीराज, सीमा गावंडे, ज्योती जाधव, नीलिमा पाटील, मनीषा पाटील, निशा वसावे या महिला या ठिकाणी विविध जबाबदारी सांभाळत आहेत.
विचार आणि कृतीचे समीकरण जुळावे : डॉ. डांगे
यंदाचे महिला दिनाचे घोषवाक्य हे 'चूस टू चॅलेंज' अर्थात आव्हानाला निवडा. मात्र महिलांना हे आव्हान विचारपूर्वक निवडायचे आहे. त्याची पूर्तता होण्यासाठी विचारांचे आणि कृतीचे समीकरण जुळले पाहिजे, त्यानंतरच आपण जे आव्हान स्वीकारले आहे ते यशस्वीपणे पेलू शकतो, कोविडच्या काळात महिलांचा प्रत्यक्ष सन्मान करणे अशक्य आहे. मात्र, चौकटीबाहेर जाऊन धिराने, आत्मविश्वासाने कुटुंब आणि आपल्या जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या महिलांना सलाम...असे विचार डॉ. शुभांगी डांगे यांनी व्यक्त केले आहेत.
फोटो