निमाड प्रांतातील व यावल - रावेर तालुक्यातील वैष्णवांचा मेळा घेऊन जाणार्या वैकुंठवासी गुरुवर्य ह.भ.प. दिगंबर महाराज संस्थानची भगवी नामपताका खांद्यावर घेऊन, टाळ-मृदगांच्या गजरात बोलावा तो विठ्ठल..! पाहावा तो विठ्ठल..!! करावा तो विठ्ठल..!!! अशा पंढरीचा राणा सख्या पांडुरंगाशी तदाकार होणाऱ्या पायी वारी दिंडीच्या तालुक्यातील खानापूर येथील प्रस्थान सोहळ्याच्या ३७ व्या वारीला यंदा कोरोनाचे "लॉक" झाले आहे.
श्रीराम मंदिरापासून ज्येष्ठ शुद्ध दशमीनिमित्त प्रस्थान पावणार्या या श्री क्षेत्र पंढरपूर पायी वारी दिंडी सोहळ्याची प्रतीकात्मक दिंडी सोहळ्यावरही अनलॉकच्या बडग्यामुळे मात्र उदासीनता दिसून आली.
ह.भ.प. दुर्गादास नेहते महाराज यांच्या नेतृत्वाखाली तर ३५ वर्षांची पायी वारीची अखंड परंपरा असलेले विणेकरी ह.भ.प. भगवंत महाराज यांच्या साथसंगतीत या पायी वारी दिंडीचा चिनावलच्या पहिल्या मुक्कामासाठी ज्येष्ठ शु. दशमीनिमित्त होणारा प्रस्थान सोहळा प्रारूप स्वरूपात सोशल डिस्टन्सिंग व मास्कचा वापर करून साजरा करण्याची वैष्णवांची अभिलाषा होती. मात्र, शासनाच्या अनलॉकच्या जाचक बडग्यामुळे विठ्ठलमय होणाऱ्या वैष्णव संप्रदायाच्या आनंदावर विरजण पडल्याने पायी वारी दिंडी सोहळ्याच्या प्रस्थान सोहळ्याच्या प्रारूप सोहळ्यावर विरजण पडले.