लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात गेल्या अडीच वर्षांपासून अमृत योजनेअंतर्गत पाणीपुरवठा व भुयारी गटार योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे. या दोन्ही योजनेचे काम सप्टेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र कोरोनामुळे या दोन्ही योजनेच्या कामांवर परिणाम झाला आहे. मजुरांअभावी अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेले भुयारी व पाणीपुरवठा योजनेची कामे रखडली आहेत. यामुळे सप्टेंबर महिन्यात पूर्ण होणारी ही कामे आता डिसेंबर महिन्यापर्यंत लांबण्याची शक्यता आहे.
अमृत अभियानांतर्गत शहरात सुरू असलेल्या पाणीपुरवठा याेजनेचे काम पुन्हा संथगतीने सुरू आहे. यामागे कामगारांची संख्या हे प्रमुख कारण ठरत आहे. आधीच अमृत पाणी पुरवठा याेजनेची मुदत संपून महिना उलटला आहे. ठेकेदाराने मुदतवाढ मिळावी यासाठी मनपा प्रशासनाकडे अर्जदेखील केला आहे. जानेवारी महिन्यापासून या दोन्ही योजनेच्या कामांना वेग आला होता. त्यामुळे भुयारी व पाणीपुरवठा योजना सप्टेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होतील अशी शक्यता होती. मात्र, फेब्रुवारी महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढल्यामुळे परराज्यातील कामगार परत यायला तयार नसल्याने या दोन्ही योजनेच्या कामांवर मोठा परिणाम झाला आहे.
होळीनिमित्त गेलेले मजूर परत येईना
पाणीपुरवठा याेजनेअंतर्गत एचडीपीई पाईप सुमारे ५८४ किलाेमीटर अंतरावर टाकण्यात येत आहे. या पाईपलाईनचे काम ९५ टक्के पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे. तर डीआय पाईपलाईन साडेपाचशे किमी अंतरावर टाकण्यात येणार आहे. या पाईपलाईनचे काम ९० टक्के झाले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून शहरासह राज्यात काेराेनाचा संसर्ग वाढला आहे. रुग्ण संख्या वाढत असल्याने हाेळीच्या सणाला परराज्यात गावी गेलेले कामगार परत येण्यास तयार नाहीत. संसर्ग हाेण्याची भीती असल्याने जिल्हाबंदी व राज्यातील नागरिकांना प्रवासावर निर्बंध आल्याने अडचणी येत आहेत. पाईपलाईनसाठी चारी खाेदणे, रस्त्यांची दुरुस्ती, जलकुंभाची उभारणी यासारखी कामे करण्यासाठी मजुरांचा तुटवडा जाणवत आहे. दरराेज ५०० पेक्षा जास्त मजुरांची गरज असताना सध्या केवळ ५० ते ६० मजुरांकडून काम पूर्ण करण्यावर भर दिला जात असल्याचे मक्तेदाराच्या प्रतिनिधींनी सांगितले. मजुरांचा प्रश्न सुटल्यास कामाला गती येऊन वेळेत काम पूर्ण करणे शक्य हाेणार असल्याचे सांगितले जात आहे.
डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार दोन्ही योजनांचे काम
अमृत अंतर्गत पाणीपुरवठा योजनेची मुदत मार्च महिन्यातच संपली आहे. तर भुयारी गटार योजनेची मुदत सप्टेंबर महिन्यापर्यंत आहे. भुयारी गटार योजनेचे काम ६५ टक्के पूर्ण झाले आहे. गेल्या महिनाभरापासून हे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. त्यामुळेच सप्टेंबर महिन्यापर्यंत भुयारी गटार योजनेचे काम पूर्ण होणे शक्य नाही. त्यात पावसाळा सुरू झाला त्याचा परिणामदेखील कामावर होण्याची शक्यता आहे. तर पाणीपुरवठा योजनेचे काम ९० टक्के पूर्ण झाले असले तरी मुख्य पाईपलाईन वरून गल्लीबोळात कनेक्शन देण्याचे काम अजूनही होऊ शकलेले नाही. त्यामुळे जोडणीच्या कामामुळे पाणी पुरवठा योजनेचे कामदेखील रखडण्याची शक्यता आहे. पाणी पुरवठा योजनेचे संपूर्ण काम डिसेंबर पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जळगावकरांना अमृतचे पाणी मिळायला पुढील वर्षाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
कोट
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने त्याचा परिणाम शहरातील विकास कामांवर झाला आहे. अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांच्या ठिकाणी मजुरांची कमतरता भासत आहे. कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर या दोन्ही योजनांच्या कामांना गती देण्याचा प्रयत्न राहील.
- जयश्री महाजन, महापौर
भुयारी गटार योजना व पाणीपुरवठा या दोन्ही योजनांच्या कामांना काही अंशी वेग आला होता. मात्र कोरोनामुळे मजुरांची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे कामे संथ गतीने सुरू आहेत. परिस्थिती निवळल्यास पुन्हा वेग वाढवून मुदतीत काम करण्याचा प्रयत्न राहणार आहे.
- अरविंद भोसले, शहर अभियंता, मनपा