लोकमत न्यूज नेटवर्क
पाचोरा : कोरोनाच्या नावाखाली बरेच गोरखधंदे सुरू झाले असून, नागरिकांची मोठ्या प्रमाणात लूट केली जात आहे. कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट असणाऱ्यांनाच विविध कार्यालयात कामकाज करण्यासाठी प्रवेश देण्यात येतो. त्यासाठी कोरोनाची टेस्ट करणे सक्तीचे केले असून, नागरिकांना कोरोना टेस्टसाठी आता पैसे मोजावे लागत आहेत. पाचोरा ग्रामीण रुग्णालयात सर्रासपणे दोनशे रुपयांत चाचणी न घेता ‘निगेटिव्ह’चे रिपोर्ट दिले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
एकीकडे कोरोनाची चाचणी घेणे बंधनकारक केलेले असताना दुसरीकडे मात्र चाचणी घेण्यासाठी गेलेल्या नागरिकांना चाचणी न करता सरळ दोनशे रुपयांत सर्टिफिकेट जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यामुळे सर्रासपणे निगेटिव्ह रिपोर्ट घेऊन नागरिक दुय्यम निबंधक कार्यालय, तहसील कार्यालय व इतर शासकीय कार्यालय, बँकांमध्ये त्याचा वापर करून आपले काम भागवत आहेत. तसेच बाहेरगावी प्रवासाला जाण्यासाठीही अशा सर्टिफिकेटचा उपयोग करून नागरिक सहीसलामत कामे करून घेत आहेत. यामुळे अशा बोगस सर्टिफिकेटमुळे कोरोनाबाधित असलेलेदेखील निगेटिव्ह दाखवून वावरताना दिसत आहेत. यावर कुणाचाही वचक नसल्याने असे उद्योग बिनधास्तपणे चालू आहे.दरम्यान, रॅपिड टेस्टच्या किट संपल्या, असे दर्शविण्यात येते व याच किट खासगीत, तसेच इतर रुग्णालयात वापरल्या जातात, त्याचीही वसुली केली जाते. यामुळे शासनाचीही फसवणूक होत असून, नागरिकांची पिळवणूक होत आहे. अशा कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी सुज्ञ नागरिकांची अपेक्षा आहे.
कोरोना चाचणी १२ वाजेपर्यंत घेतली जाते. चाचणीच्या अहवालासाठी नागरिक आग्रह धरत असावेत. अशावेळी कर्मचारी परस्पर शुल्क घेत असतील तर कारवाई करावी लागेल.-डॉ. अमित साळुंखे,वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, पाचोरा.