लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा व्यापारी महामंडळाचे कार्याध्यक्ष सुरेश रामकृष्ण चिरमाडे (रा. जानकीनगर, वय ७१) यांचे मंगळवारी दुपारी नाशिक येथे उपचारादरम्यान निधन झाले.
न्युमोनिया झाल्याने त्यांना नाशिक येथे दाखल करण्यात आले होते. त्या वेळी कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. या सोबतच त्यांना हृदयाचा त्रास असल्याने मंगळवारी त्यांची प्रकृती अधिकच खालावली व दुपारी त्यांचे निधन झाले. चिरमाडे यांचा २३ मार्च रोजी वाढदिवस होता आणि त्याच दिवशी काळाने त्यांच्यावर झडप घातली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. ते रूपेश चिरमाडे यांचे वडील होत. खान्देश एज्युकेशन सोसायटीचे कोषाध्यक्ष, लोखंड हार्डवेअर असोसिएशनचे माजी अध्यक्ष, रोटरीचे माजी अध्यक्ष अशा विविध संस्था, संघटनांचा यशस्वी कारभार सांभाळला. त्यांच्या निधनाने सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.
व्यापार, शिक्षण, सामाजिक क्षेत्राचे अपरिमित नुकसान
सुरेश चिरमाडे यांच्या निधनाचे वृत्त जळगावात समजताच व्यापार, शिक्षण, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त होऊन चिरमाडे यांच्या निधनाने विविध क्षेत्राचे अपरिमित असे नुकसान झाले, अशा प्रतिक्रिया उमटल्या.