जळगाव : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा पूर्व परीक्षेच्या वेळीच कोरोनाची लागण झाली तरी त्याची तमा न बाळगता जळगावातील एका केंद्रावर कोरोनाबाधित रुग्णाने ही परीक्षा दिली. कधीपासून परीक्षेची तयारी केली व ऐन महत्त्वाच्या टप्प्यावरच कोरोना झाला तरी नुकसान होऊ नये म्हणून हा उमेदवार परीक्षेसाठी सरसावला. यंत्रणेमार्फत संपूर्ण दक्षता घेत या उमेदवाराची स्वतंत्र खोलीत बैठक व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान, रविवारी झालेल्या या परीक्षेच्या एकूण सहा हजार २६१ उमेदवारांपैकी तीन हजार ८६० उमेदवारांनी परीक्षा दिली तर दोन हजार ४०१ उमेदवार गैरहजर होते.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा पूर्वी १४ मार्च रोजी होणार होती. मात्र कोरोना संसर्गाचे कारण सांगत ही परीक्षा स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर आंदोलनही झाले. त्यानंतर अखेर २१ मार्च रोजी ही परीक्षा घेण्याचे निश्तिच झाले.
त्यानुसार जळगावात २१ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी १२ व दुपारी ३ ते सायंकाळी ५ अशा दोन सत्रात जळगाव शहरातील १६ उपकेंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. परीक्षेसाठी ४८९ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
कोरोना असल्याचे स्वत: सांगितले केंद्रावर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा पूर्व परीक्षेची तयारी केली असताना ऐन परीक्षेच्या वेळी कोरोना झाला व आता कसे होणार अशी चिंता परीक्षार्थीसमोर उभी राहिली. मात्र कोरोना अथवा इतर लक्षणे असलेल्या उमेदवारांची स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात येणार असल्याने कोरोना झाला तरी त्याची चिंता न करता एका कोरोनाबाधित उमेदवाराने रविवारी आयएमआर परीक्षा केंद्रावर ही परीक्षा दिली. केंद्रावर आल्यानंतर सर्वांची तपासणी सुरू असताना या उमेदवाराने स्वत:हून आपल्याला कोरोना असल्याची माहिती दिली. त्यानुसार या उमेदवाराची स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली.
परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना सुरक्षा कीट
परीक्षा केंद्रावर उमेदवारांना सुरक्षा कीट देण्यात आले. यामध्ये मास्क, सॅनिटायझर, ग्लोज देण्यात येऊन संपूर्ण दक्षता घेण्यात आली. या सोबतच प्रवेश देताना शरीराचे तापमान मोजण्यात येऊन तसेच सॅनिटाईज करून उमेदवारांना प्रवेश देण्यात आला. सोबतच अंतर ठेवून बैठक व्यवस्था करण्यात आली होती.
पहिले सत्र संपल्यानंतर केंद्रांवर थांबले
दोन सत्रात झालेल्या या परीक्षेचे पहिले सत्र झाल्यानंतर उमेदवार केंद्रातून बाहेर न पडता त्याच परिसरात थांबून होते. यासाठी अगोदरच उमेदवारांनी सोबतच आणलेला जेवणाचा डबाही केंद्रांवर खाल्ला. त्यानंतर दुपारी दुसरे सत्र झाले.
तणावमुक्त होत दिली परीक्षा
कोरोनाचा संसर्ग असला तरी त्याची चिंता न करता उमेदवारांनी तणावमुक्त राहत ही परीक्षा दिली. कोरोनाची चिंता करण्यापेक्षा जीवनातील या महत्त्वाच्या टप्प्यावर परीक्षेकडे लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे असल्याचे सांगत परीक्षेची काठीण्य पातळीदेखील योग्य होती, अशा प्रतिक्रिया उमेदवारांनी व्यक्त केल्या.
३९ टक्के गैरहजर
सदर परीक्षेकरीता एकूण ६ हजार २६१ परीक्षार्थी होते. मात्र या पैकी केवळ तीन हजार ८६० उमेदवारांनी परीक्षा दिली तर दोन हजार ४०१ उमेदवार गैरहजर होते. तब्बल ३९ टक्के उमेदवारांची या परीक्षेदरम्यान गैरहजेरी राहिली.
पेपर एकत्रित करून टपाल कार्यालयात जमा
शहरातील १६ केंद्रांवर दोन सत्रात परीक्षा झाल्यानंतर सर्व पेपर एकत्रित करून अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ते मुंबई येथे पाठविण्यासाठी टपाल कार्यालयात जमा केले.
आंदोलनामुळे आठवडाभरात झाली परीक्षा
१४ मार्च रोजी होणारी ही परीक्षा कोरोनामुळे स्थगित झाली होती. यामुळे उमेदवार व विविध संघटना आक्रमक झाल्या होत्या व यासाठी आंदोलनदेखील करण्यात आले होते. या आंदोलनामुळे आठवड्यानंतर ही परीक्षा घेण्याचे ठरविण्यात आहे. आंदोलन झाले नसते तर परीक्षा आणखी लांबली असती, असेही काही उमेदवारांनी सांगितले.
—————————
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्य सेवा पूर्व परीक्षा कोरोना काळात आली तरी त्याचा ताणतणाव न ठेवता ही परीक्षा दिली. केंद्रांवर योग्य काळजी घेतली गेली व नियोजनही व्यवस्थित होते.
- राहुल गायकवाड, परीक्षार्थी
परीक्षेचा पॅटर्न चांगला असण्यासह काठीण्य पातळीदेखील योग्य होती. केंद्रांवरील काळजी व व्यवस्था पाहता खरोखर आयोगाची परीक्षा असल्याचे जाणवले.
- बापू वसावे, परीक्षार्थी