जळगाव : लॉकडाऊनमुळे अडकलेल्या प्रवाशांना रितसर प्रशासनाची परवानगी घेऊन राजस्थानात सोडायला गेलेल्या उमेश बाबुलाल प्रजापत (२८,रा.आयोध्या नगर)या तरुणाचा ट्रॅक्टर-कार अपघातात मृत्यू झाला. रविवारी दुपारी दोन वाजता धार धामनोड या मार्गावर हा अपघात झाला. उमेश हा कारने (क्र.एम.एच.१९ ए.पी.८४८८) राजस्थानात प्रवासी सोडायला गेला होता. तेथून परत येत असताना धार-धामनोड रस्त्यावर ट्रॅक्टर व कारची धडक झाली. त्यात कारचा चुराडा झाला असून उमेश जागेवरच गतप्राण झाला तर ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी झाला आहे. उमेश हा आयएमआर महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी होता. सध्या तो फोटोग्राफीचा व्यवसाय करत होता. त्याच्या वडिलांचा केटरिंगचा व्यवसाय आहे. उमेश याचे आई, वडील राजस्थानात गेले आहेत. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर भाऊ तातडीने रवाना झाला. उमेशची पत्नी गृहिणी असून त्यांना एक दीड वर्षाची मुलगी आहे. दरम्यान, रविवारी त्याने आई, वडीलांचा कारमधील फोटो असलेले स्टेटस मोबाईलवर ठेवले होते व ‘मीस यू डॅड मॉम’ असा उल्लेख त्यात केला होता.
आई-बाबांसाठी ठेवलेलं 'ते' स्टेटस अखेरचं ठरलं; प्रवाशांना सोडायला गेलेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2020 9:16 PM