येथील ऐतिहासिक विजय स्तंभाला मानवंदना व अभिवादन करण्यासाठी दरवर्षी लाखो अनुयायी येत असतात. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मानवंदना कार्यक्रम साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे. तसेच या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शिक्रापूर पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या शिक्रापूर ते चाकण दरम्यानची वाहतूक ३१ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजल्यापासून १ जानेवारी २०२१ रोजी रात्री १२ पर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे शिक्रापूरमार्गे पुण्यात जाणाऱ्यांना इतर पर्यायी मार्गाने जाण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
इन्फो :
जळगाव विभागाच्या बसेस शिरूरमार्गे पुण्यात जाणार :
पुणे जिल्हा प्रशासनातर्फे शिक्रापूर - चाकण दरम्यानची वाहतूक शुक्रवारी रात्री मध्यरात्रीपर्यंत बंद राहणार असल्यामुळे, एस. टी. महामंडळाच्या जिल्हाभरातून औरंगाबाद, नगरमार्गे पुण्याला जाणाऱ्या बसेस शिरूर, पारगाव व हडपसरमार्गे पुण्याकडे जाणार आहेत, तर पुण्याकडूनही याच मार्गे येणार आहेत. वाहतुकीच्या बदलाबाबत पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र नुकतेच जळगाव विभागाला प्राप्त झाले आहे. या पत्रानुसार वाहतुकीच्या नियोजनाबाबत संबंधित आगारांना सूचना केल्याचे विभागीय वाहतूकचे दिलीप बंजारा यांनी सांगितले. दरम्यान, जिल्हाभरातील अकरा आगारांमधून सध्या दिवसभरात ३० बसेस पुण्याकडे जात असल्याचेही बंजारा यांनी सांगितले.