नियुक्त केलेले पथक केवळ नावालाच
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. एकीकडे शहरातील खाजगी व शासकीय रुग्णालयांमध्ये बेड शिल्लक नसताना दुसरीकडे महापालिकेचा कोरोना सेंटरमध्ये अनेक बेड शिल्लक आहेत. कारण कमी लक्षणे असलेल्या रुग्णांना महापालिकेकडून गृह विलगीकरणासाठी सूट देण्यात आली आहे. मात्र अनेक रुग्ण घरी गेल्यानंतर या रुग्णांकडे महापालिका प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.
अनेक रुग्णांना कमी लक्षणे असल्याने हे रुग्णालय घरी न थांबता बाहेर असल्याच्या ही घटना शहरात आढळून आल्या. शहरात तब्बल १ हजाराहून अधिक रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. शहरात २ हजार ६८७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी १ हजार ३५३ रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. याची नोंद केवळ महापालिकेकडे आहे मात्र हे रुग्ण नेमके घरीच आहेत की घराबाहेर फिरत आहेत याबाबत महापालिकेकडून कोणतीही लक्ष दिले जात नाही. महापालिका प्रशासनाने गृह विलगीकरण बाबत गांभीर्याने लक्ष न देणाऱ्या रूग्णांवर कारवाई करण्यासाठी पथक नेमण्यात आली आहेत. मात्र आतापर्यंत या पथकांकडून शहरात एकही कारवाई करण्यात आलेली नाही.