लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव -यंदा कोरोनामुळे जळगाव मनपाची मालमत्ताधारकांकडे मागील व चालु वर्ष मिळून तब्बल ६० कोटींची थकबाकी आहे. त्यातच यंदा २० डिसेंबर अखेर केवळ ३९ टक्के वसुली झाली आहे. त्यामुळे मागील व चालु वर्ष मिळून तब्बल ६० कोटी रुपयांच्या वसुलीचे आव्हान मनपा प्रशासनाला पेलावे लागणार आहे. विशेष म्हणजे १ जानेवारीपासून मालमत्ताकराची रक्कम न भरणाऱ्यांकडून करावर २ टक्के शास्ती लावण्यात येणार आहे.
२२ मार्चपासून कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर एप्रिल व मे महिन्यात सर्वप्रकारच्या कराची वसुली मनपाकडून थांबविण्यात आली. तसेच जून महिन्यपासून वसुलीला सुरुवात झाली. मात्र, जून व जुलै महिन्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने केवळ २ ते ३ टक्केच वसुली या दोन महिन्यात झाली. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून, मनपाकडून आता येत्या काळात मालमत्ता कराच्या वसुलीसाठी तीव्र मोहीम राबविण्याचे नियोजन सुरु आहे. ऑगस्टपर्यंत दोन ते तीन लाखांचा भरणा प्रभाग समित्यांमध्ये होत होता. मात्र, आता हा भरणा २५ ते ३० लाखांपर्यंत झाला आहे. तसेच ३१ डिसेंबरनंतर मालमत्ताकराच्या एकूण रक्कमेवर २ टक्के शास्ती (व्याज) लागणार असल्याने प्रभाग समित्यांमध्ये कर भरण्यासाठी गर्दी होत आहे.
बिलांचे वाटप सुरूच
कोरोनामुळे संपुर्ण प्रशासकीय यंत्रणा संसर्ग रोखण्यासाठी कार्यरत होती. त्यामुळे मनपाचे दैनंदिन कामाकडे दुर्लक्ष झाले होते. चार ते पाच महिने मुळ काम न झाल्याने प्रशासनाकडून गेल्या महिनाभरापासून बिलांचे वाटप हाती घेण्यात आले आहे. बिलांचे वाटप अंतिम टप्प्यात आले असून दोन दिवसात हे काम पूर्ण होणार आहे.
यंदा केवळ ३९ टक्के वसुली
२०२०-२१ या आर्थिक वर्षात मनपाची केवळ ३८ टक्के वसुली झाली आहे. मनपाची एकूण मागणी ६० कोटींच्या घरात आहे. मात्र, ४५ कोटींपर्यंत वसुली होत असते. यंदा २० डिसेंबरपर्यंत केवळ १९ कोटीपर्यंतची वसुली झाली आहे. गेल्या वर्षी केवळ १३ ते १५ कोटींची वसुली झाली होती. गेल्यावर्षीची तब्बल ३० कोटींच्यावर थकबाकी आहे. १ जानेवारीपासून मनपा वसुलीची मोहीम तीव्र करण्याची शक्यता आहे.
प्रभाग निहाय एकूण वसुली
प्रभाग १ - ८ कोटी ८८ लाख ८० हजार २२२
प्रभाग २ - ४ कोटी ७ लाख ८० हजार ९८०
प्रभाग ३ - ६ कोटी ६ लाख ७२ हजार ६४२
प्रभाग ४ - ६ कोटी ३० लाख ५८ हजार ४१८
प्रभागनिहाय एकूण थकबाकी
प्रभाग १ - १६ कोटी ६६ लाख ३ हजार २५
प्रभाग २ - १३ कोटी ३१ लाख ४८ हजार ३३
प्रभाग ३ - २३ कोटी ९७ लाख ११ हजार ७७०
चालु वर्षाची वसुली
प्रभाग १- ७ कोटी ६४ लाख ७७ हजार ४६५
प्रभाग २ - ३ कोटी १५ लाख ८३ हजार २७४
प्रभाग ३ - ४ कोटी ९२ लाख १० हजार ७६८
प्रभाग ४ - ५ कोटी ४१ लाख ७२ हजार ५९४
मागील वर्षाची वसुली
प्रभाग १ - १ कोटी २ लाख ४० ७ हजार ७५४
प्रभाग २ - ९१ लाख ९७ हजार ७०६
प्रभाग ३ - १ कोटी १४ लाख ६१ हजार ८७४
प्रभाग ४ - ८८ लाख ८५ हजार ८२४
मागील वर्षाची थकबाकी
प्रभाग १ -७ कोटी ६१ लाख ९३ हजार १०८
प्रभाग २ - ८ कोटी ४३ लाख ७७ हजार ८१४
प्रभाग ३ - १५ कोटी ९१ लाख ५१ हजार ५०७
चालू वर्षाची थकबाकी
प्रभाग १ - ९ कोटी ४ लाख ९ हजार ९१७
प्रभाग २ -४ कोटी ८७ लाख ७० हजार २१४
प्रभाग ३ - ८ कोटी ५ लाख ६० हजार २६३
कोट..
मालमत्ताकराच्या रक्कमेसाठी सोमवारी सर्व प्रभाग समिती अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. सर्व अधिकाऱ्यांना आता मालमत्ता कराच्या वसुलीवर लक्ष घालण्याचा सूचना दिल्या असून, तीन महिन्यात मागील व चालू वर्षाचे उदिष्ट पूर्ण करण्यावर मनपाचा भर असणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी झाला असल्याने मनपाचे लक्ष आता वसुलीवर राहणार आहे.
-सतीश कुलकर्णी, मनपा आयुक्त
सर्व विभागप्रमुखांना मालमत्ताकराच्या वसुलीबाबत सूचना दिल्या आहेत. याबाबत सातत्याने आढावा घेतला जात आहे. कोरोनाची परिस्थिती असल्याने यंदा वसुली होवू शकली नव्हती. मात्र, आता परिस्थिती बदलत असून, मनपाच्या यंत्रणेला वसुलीवर लक्ष केंद्रीत करण्याचा सूचना दिल्या आहेत.
-राजेंद्र घुगे-पाटील, सभापती, मनपा स्थायी समिती