लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : ‘अमृत’अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामात मनपा प्रशासनाने वॉटर मीटरची तरतूद न केल्याने मनपासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यात राज्य शासनाने या प्रकरणी हात वर केले असून, आता मनपा प्रशासनाने वॉटर मीटर बसविण्यासाठी सार्वजनिक भागीदारीमधून काही खासगी कंपन्यांना याबाबतचा प्रस्ताव देऊन शहरात वॉटर मीटर बसविण्यासाठी हालचाली सुरू केल्या असल्याची माहिती मनपा सूत्रांनी दिली आहे.
मनपाकडून कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर खासगी कंपन्यांसोबत चर्चा करून शहरातील वॉटर मीटरचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आतापासूनच तयारी केली आहे. शहरातील अमृतअंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम जवळ जवळ ९० टक्के पूर्ण झाले आहे. या योजनेचे संपूर्ण काम वर्षभरात पूर्ण होणार असून, नागरिकांना २४ तास पाणीपुरवठा होणार आहे. मात्र, वॉटर मीटरची तरतूद नसल्याने २४ तास पाणीपुरवठा होणे कठीण होणार आहे. यामुळे वॉटर मीटरचा प्रश्न गंभीर झाला होता. त्यात मनपाने वॉटर मीटर बसविण्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता. मात्र राज्य शासनाने हा प्रस्ताव नाकारून अमृतअंतर्गत ज्या शहरात पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. त्याठिकाणी स्थानिक प्रशासनानेच वॉटर मीटरची तरतूद करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. त्यामुळे मनपाला वॉटर मीटर हे आपल्या फंडातूनच करावे लागणार आहेत. आधीच आर्थिक परिस्थितीत अडकलेल्या महापालिकेला आता वॉटर मीटरसाठी ९६ कोटींची तरतूद करण्याचे आव्हान पार पाडावे लागणार आहे. त्यासाठी मनपा प्रशासनाने सार्वजनिक भागीदारीतून हा प्रश्न सोडविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
मनपाच्या अंदाजपत्रकातही केली होती तरतूद
मनपा प्रशासनाकडून फेब्रुवारी महिन्यात सादर करण्यात आलेल्या अंदाजपत्रकात वॉटर मीटरबाबत सार्वजनिक खासगी भागीदारीतून बसविण्याचे मनपा आयुक्तांनी जाहीर केले होते. शहरातील अमृत योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. नागरिकांना २४ तास पाणीपुरवठा करण्यात यावा यासाठी आवश्यक असलेले वॉटर मीटरसाठी लागणारा खर्च सार्वजनिक खासगी भागीदारीतून तयार करण्यात येणार आहे. याबाबत मुंबई येथील एआयबीसीसी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला मनपा प्रशासनाने प्रस्ताव दिला असून, याबाबत प्राथमिक पातळीवर चर्चा झाल्याची माहितीही मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
अत्याधुनिक जलशुद्धीकरण यंत्रणेसाठी ही कंपनीची तयारी
वॉटर मीटरसोबतच शहराला पाणीपुरवठा करणारी यंत्रणा फार जुनी झाली असून, यंत्रणा दुरुस्ती, पाणी खरेदी, शुद्धीकरण आणि विद्युत बिलापोटी साधारण: प्रतिहजार लिटर पाण्यासाठी १६ रुपये खर्च येतो. जळगावात नवीन जलशुद्धीकरण यंत्रणा मोफत बसवून देत ११ रुपये दराने पाणी देण्यासाठी एका कंपनीने प्रस्ताव दिला असून, यावरदेखील मनपा प्रशासनाचे बोलणी सुरू आहे.
कोट..
वॉटर मीटरबाबत सार्वजनिक भागीदारीमधूनच हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही खासगी कंपनीशीदेखील बोलणी सुरू आहे. कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणल्यानंतर याबाबत चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न राहील.
- सतीश कुलकर्णी, आयुक्त, मनपा