जळगाव - जिल्ह्यासह शहरात मार्च महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट पसरल्यामुळे मनपाची सर्व यंत्रणा कोरोनावरील नियंत्रणासाठी लागली होती. अशा परिस्थितीत देखील मनपा प्रशासनाने गेल्या तीन महिन्यात मालमत्ताकराच्या स्वरुपात तब्बल ११ कोटी ८८ लाख ६२ हजार रुपयांची वसुली केली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी जून महिन्यापर्यंत केवळ १ कोटी रुपयांची वसुली झाली होती. मात्र, यावर्षी मनपाने कोरोनानियंत्रणासह वसुलीवर देखील लक्ष केंद्रित केल्यामुळे मनपाच्या वसुलीची स्थिती सुधारली आहे.
महापालिकेने सन २०२१-२०२२ या आर्थिक वर्षासाठी एप्रिलपासून वसुलीला सुरुवात केली होती. यामध्ये ३० जूनपर्यंत मालमत्ताकराची रक्कम भरणाऱ्या नागरिकांना एकूण रक्कमेवर १० टक्के सूट देण्याची सवलत मनपाने सुरु केली होती. कोरोनाची परिस्थिती असल्याने मनपा प्रशासनाने ही रक्कम केवळ चेक व ऑनलाईन स्वरुपातच स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता. असे असतानाही मनपाची वसुली चांगलीच वाढली आहे.
मोठ्या मालमत्तांमधून वसुलीसाठीही हालचाली
मनपा प्रशासनाने आता आपले हक्काचे उत्पन्न स्त्रोत असलेल्या मालमत्तांकडे देखील लक्ष देण्याची तयारी सुरु केली आहे. महापालिकेला केवळ मालमत्ताकराच्या रक्कमेतून उत्पन्न मिळत असून, गेल्या ९ वर्षांपासून मनपाला मुदत संपलेल्या जवळपास २३ मार्केटमधील गाळेधारकांकडे थकीत भाड्याची रक्कम मिळू शकलेली नाही. यामुळे मनपा प्रशासनाने गेल्या महिन्यात महासभेत प्रस्ताव दाखल करून, ठराव मंजूर करून घेतला आहे. त्यामुळे आता गाळेधारकांकडील थकीत भाडे वसूल करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. तसेच महापालिकेने कोट्यवधी रूपयांची जे.के.पार्कची जागा ताब्यात घेतल्यानंतर आता महामार्गावरील ट्रान्सपोर्ट नगराच्या जागेकडे लक्ष केंद्रीत केले आहे. औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेत पुढील दिशा ठरविण्यासाठी प्रशासनाने वकिलांचा सल्ला मागवला आहे. तसेच जागा ताब्यात घेण्यासाठी महासभेत देखील ठराव करण्याची तयारी सुरू आहे. या दोन्ही मालमत्तांच्या स्वरुपात मनपाला सुमारे २५० कोटींचे उत्पन्न मिळणार आहे.
प्रभाग समितीनिहाय झालेली वसुली
प्रभाग समिती १ - ४ कोटी ३६ लाख ३९ हजार ३०९
प्रभाग समिती २ - १ कोटी ४६ लाख १७ हजार ७७४
प्रभाग समिती ३ - २ कोटी ७१ लाख ७७ हजार ७७५
प्रभाग समिती ४ - ३ कोटी ३४ लाख २७ हजार ३४९