लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - शहराचे वैभव असलेल्या मेहरूण तलावात जलपर्णी या वनस्पतीचे वाढत जाणाऱ्या प्रमाणामुळे तलावाचे वैभव नष्ट होण्याचा मार्गावर आहे. याबाबत ‘लोकमत’ने वेळोवेळी आपली भूमिका जाहीर करून, मेहरूण तलावात होत असलेल्या प्रदूषणाबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केले आहे. एकीकडे जलपर्णीचा विळखा वाढत असताना, मनपा प्रशासनाने केवळ ३ लाखांचा खर्चाकडे पाहून तलावात वाढत जाणाऱ्या जलपर्णी काढण्यास नकार दिला असल्याची माहिती समोर आली आहे.
मराठी प्रतिष्ठानकडून मनपा आयुक्त व महापौरांकडे तलावातील जलपर्णी काढण्याची मागणी केली होती. त्यानुसार महापौर भारती सोनवणे यांनी मनपा आयुक्तांकडे याबाबत चर्चा करून, जलपर्णी काढण्याबाबत सूचना दिल्या होत्या. मात्र, आयुक्तांनी तलावाची पाहणी करून, जलपर्णी तलावाच्या मुख्य भागात नसल्याने ती पाणी कमी झाल्यावर उन्हामुळे आपोआप नष्ट होईल, असा अंदाज लावला होता. त्यामुळे मनपाने जलपर्णी काढण्यासाठी ३ लाखांचे अंदाजपत्रक तयार केले होते. मात्र, त्यानंतर जलपर्णी काढण्याचा विषय प्रलंबितच राहिला.
सुशोभिकरणावर कोट्यवधींचा खर्च, जैवविविधतेकडे मात्र दुर्लक्ष
मनपाकडून आतापर्यंत मेहरूण तलावाच्या बाह्य सौंदर्यांवर कोट्यवधीचा खर्च करण्यात आला आहे. मात्र, तलावातील प्रदूषित होणाऱ्या पाण्याबाबत कोणताही विचार मनपाकडून आतापर्यंत झालेला नाही. अनेक वर्षांपासून तलावात सांडपाणी सोडले जात आहे. मात्र, यावर कोणताही उपाय मनपाने केलेला नाही. तर आता जलपर्णी वाढत जात असतानाही मनपाकडून उपाययोजना नाहीत, सांडपाण्यामुळे पाणी प्रदूषित होत असल्याने पाण्यातील जलचरांचे आयुष्य धोक्यात आले आहे.