लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातून गेलेल्या मात्र बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यात आलेल्या सहा रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्याचे काम मनपाकडून सुरू आहे. आसोदा रस्त्यालगत अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. या ठिकाणी झोपडपट्टी तयार झाली असून, मनपाकडून लवकरच १६५ झोपड्यांचे अतिक्रमण काढण्यात येणार आहे. मात्र, त्याआधी मनपाकडून या ठिकाणच्या झोपडपट्टीबाबत काही जुन्या आदेशांसोबत काही माहिती घेतली जाणार आहे. या अतिक्रमणाला संरक्षित केल्यास अतिक्रमण काढण्याआधी मनपाकडून पर्यायी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
आसोदा रस्त्यालगत दोन्ही बाजुला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. हे अतिक्रमण काढण्याबाबत अनेक वर्षांपासून मागणी केली जात आहे. मात्र, आता हे रस्ते बांधकाम विभागाकडे वर्ग झाल्यामुळे हे अतिक्रमण काढण्याशिवाय महापालिकेकडे पर्याय नाही. मात्र, हे अतिक्रमण शहरातील इतर अतिक्रमणापेक्षा वेगळे आहे. अतिक्रमण काढल्यास १०० हून अधिक कुटुंबे उघड्यावर येणार आहेत. त्यामुळे याबाबतचा विचार करूनच मनपाकडून याठिकाणच्या कारवाईचा विचार करावा लागणार आहे. शासन किंवा महापालिकेने याआधी या अतिक्रमणधारकांबाबत काही आदेश काढले असल्यास त्या आदेशांची पडताळणी केली जाणार आहे. याबाबतचा अभ्यास केल्यानंतरच मनपाकडून पुढील कार्यवाही केली जाणार आहे. दरम्यान, अतिक्रमण काढण्याआधी मनपाला पोलीस बंदोबस्त घ्यावा लागणार असून, याबाबत पोलीस प्रशासनाला मनपाकडून पत्र पाठविण्यात येणार आहे. हे अतिक्रमण संरक्षित नसल्यास पोलिसांचा बंदोबस्त घेऊन पुढील आठवड्यातच मनपाकडून याठिकाणी कारवाई केली जाणार आहे.