कोरोनामुळे १ मेपासून कडक लॉकडाऊन करण्यात आल्याने, एसटी महामंडळाची सेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद होती. फक्त अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीच काही तालुक्यांना बसेस सोडण्यात येत होत्या. कोरोनामुळे महामंडळाची ९० टक्के सेवा बंद असल्यामुळे एकट्या जळगाव विभागाचे १८ कोटींच्या घरात आर्थिक नुकसान झाले. मात्र, आता १ जूनपासून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये काहीशी शिथिलता आल्यामुळे महामंडळातर्फे मंगळवारपासून पुन्हा बस फेऱ्या नियमित करण्यात आल्या आहेत. पुणे व मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळे हे जिल्हे वगळता, औरंगाबाद, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांत बस सेवा सुरू करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. तसेच जिल्हाअंतर्गत चाळीसगाव, पाचोरा, जामनेर, यावल, रावेर या मार्गावरच्या फेऱ्याही वाढविण्यात आल्याचे सांगण्यात आले.
इन्फो :
तर टप्प्या-टप्प्पयाने फेऱ्या वाढविण्यात येणार :
विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी सांगितले की, सध्या जिल्हाअंतर्गत आणि जिल्ह्याबाहेरही काही फेऱ्या सुरू केल्या आहेत. या फेऱ्यांसाठी ११८ चालक व त्यासाठी तितकेच ११८ वाहक कामावर बोलावण्यात आले आहेत. प्रवाशांची संख्या वाढेल, तसतशा फेऱ्या वाढविण्यात येतील आणि कर्मचाऱ्यांचीही संख्या वाढविण्यात येणार असल्याचे जगनोर यांनी सांगितले.