लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापालिका प्रशासनाने अनेक वर्षांपासून धूळ खात पडलेल्या मालमत्ता ताब्यात घेण्याच्या हालचाली आता सुरू केल्या आहेत. मेहरुण परिसरातील जेके पार्क महापालिकेने ताब्यात घेतल्यानंतर आता गेल्या सहा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ट्रान्स्पोर्ट नगरची जागा महापालिकेने ताब्यात घेण्याची तयारी सुरू केली आहे. याबाबत मनपा प्रशासनाने विधी तज्ञांकडून अभिप्राय मागवला असल्याची माहिती मनपा सूत्रांनी दिली आहे.
महापालिकेची आर्थिक परिस्थिती बेताची असताना दुसरीकडे महापालिकेच्या कोट्यावधीच्या जागांकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होते. मात्र महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेने प्रशासनाला हाताशी धरून अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेला मनपाच्या मालकीच्या जागा ताब्यात घेण्याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे. जेके पार्कची जागा दोन महिन्यांपूर्वी महापालिका प्रशासनाने ताब्यात घेतली. आता ट्रान्स्पोर्ट नगर मधील अनेक दुकानांचा करार गेल्या पाच वर्षांपासून संपुष्टात आला आहे. मात्र महापालिका प्रशासनाने ही जागा ताब्यात घेण्याबाबत कोणतेही लक्ष न दिल्याने हे प्रकरण देखील न्यायालयापर्यंत पोहोचले आहे. औरंगाबाद खंडपीठात ट्रान्स्पोर्ट नगर मधील दुकानदारांनी मनपा प्रशासनाच्या विरोधात दाखल केलेल्या याचिके विरोधात पुढील दिशा ठरवण्यासाठी प्रशासनाने ज्येष्ठ विधी तज्ञांचा सल्ला मागवला आहे. या भागात पुढील महिन्यात होणाऱ्या महासभेत मनपा प्रशासनाकडून महासभेच्या मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. ट्रान्स्पोर्ट नगरची जागा सुमारे २५ कोटी रुपयांच्या पेक्षा जास्त असल्याचेही सांगितले जात आहे.
सर्व प्रकारच्या मालमत्तांची माहिती घेण्यास सुरुवात
महापालिका प्रशासनाने मनपा मालकीच्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या जागांकडे लक्ष द्यायला सुरुवात केली असून, मनपा आयुक्तांनी याबाबत सर्व माहिती मागितली असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. टप्प्याटप्प्याने या सर्व मालमत्तांचे प्रलंबित विषय मार्गी लावण्याबाबत मनपाने रणनीती ठरवली असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या नऊ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांच्या विषय आधी महापालिका प्रशासनाने अजेंड्यावर घेतला असून, त्यानंतर ट्रान्स्पोर्ट, भंगार बाजार व घरकुलांच्या विषय देखील मार्गी लावण्यात येणार आहे.