जळगाव : शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया होत नसल्याने राष्ट्रीय हरित लवादाने महापालिकेचा २ कोटी रुपयांचा निधी सप्टेंबर २०१९ मध्ये गोठवला होता. आता १७ महिन्यांनंतर देखील २ कोटींचा निधी असलेले खाते सीलच आहेत. दरम्यान, जोपर्यंत मलनिस्सारण योजना पुर्ण होणार नाही तोपर्यंत हा निधी गोठवलेलाच राहणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मलनिस्सारण योजनेच्या कामाला झालेल्या उशीरमुळे हरित लवादाने ही कारवाई केली आहे.
भुयारी गटार योजनेचे काम निकृष्ट
जळगाव - शहरात अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या मलनिस्सारण योजनेचे काम अंत्यत निकृष्ट दर्ज्याप्रमाणे सुरु आहे. बहतेक काम हे डस्ट मध्येच करण्यात आले असून, काही ठिकाणच्या तक्रारीनंतर ठराविक कामच वाळुव्दारे करण्यात आले आहे. तसेच संपुर्ण योजनेच्या कामावर देखरेख ठेवण्याचे काम मनपातील एकाच अभियंतावर सोपविण्यात आले असून, यामुळे या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचा शहरातील अमोल कोल्हे यांनी केला आहे. याबाबत कोल्हे यांनी मनपा आयुक्तांकडे तक्रार केली आहे.
शेतकऱ्यांचा विरोधानंतर हमाली दरात १० टक्केच वाढ
जळगाव - कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमाली दराच्या करारात १० टक्के वाढ करण्यात आली आहे. हमाल-मापाडी संघटनेकडून ३० टक्के दरवाढ करण्याची मागणी केली होती. मात्र, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी किशोर चौधरी, मिलिंद चौधरी यांनी ही वाढ करू नये अशी मागणी केली होती. त्यातच वाढ होत नसल्याने हमाल मापाडी संघटनेने ९ दिवसांपासून बंद पुकारला होता. बाजार समितीने शनिवारी १० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर हमाल मापाडी संघटनेने बंद मागे घेतला आहे. शेतकऱ्यांचेही नुकसान नाही व हमाल-मापाडींचेही नुकसान नाही असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सभापती कैलास चौधरी यांनी दिली.
शिवाजीनगरातील ‘ती’ जलवाहिनी हलवली
जळगाव - शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामात अडथळा ठरणारी जलवाहिनी महापालिकेने शनिवारी हटवली. यामुळे पुलाच्या तटबंदीच्या कामाला गती येऊ शकेल. दोन वर्षांपासून शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. पुलाच्या मार्गातील मनपाच्या जलवाहिन्या व महावितरणचे दुभाजकांमधील विद्युत पोल अडथळा ठरत असल्याने त्यांचे स्थलांतराअभावी काम ठप्प झाले होते. ही जलवाहिनी हलविल्यामुळे आता पुन्हा पुलाच्या कामाला गती येणार आहे.