जळगाव - घरकुल खटल्यात शिक्षा ठोठावण्यात आलेल्या पाचही नगरसेवकांच्या अपात्रतेबाबत जिल्हा न्यायालयात दाखल याचिकेवर शुक्रवारी कामकाज होणार आहे. दरम्यान, औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या शिक्षेला स्थगितीसाठी नगरसेवकांनी दाखल केलेल्या अपीलावर ४ जानेवारी रोजी कामकाज न झाल्याने १८ रोजी सुनावणी होणार. त्यामुळे जळगाव न्यायालयात दाखल अपात्रतेच्या दाव्यात पुढची तारीख मागीतली जाण्याची शक्यता आहे.
सुरत रेल्वेगेटवर तासभर वाहतूक कोंडी
जळगाव - शहरातील दुध फेडरेशनजवळील सुरत रेल्वेगेटवर वाहतूक कोंडीची समस्या आता नित्याचीच झाली आहे. गुरुवारी दुपारी १ वाजता मालवाहतूक करणारी ट्रक रेल्वे ट्रॅकजवळ बंद झाल्याने तब्बल तासभर वाहतूक कोंडी निर्माण झाली. यामुळे रेल्वेगेटच्या चारही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागली. त्यातच याठिकाणी वाहतूक शाखेचा कोणताही कर्मचारी नसल्याने ही वाहतूककोंडी सुरळीत करताना रेल्वे कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक उडाली.
वाळू उपसा पुन्हा सुरु
जळगाव - महसुल प्रशासनाने गिरणा नदीतील अवैध वाळू उपसाकडे कानाडोळा केल्यानंतर पुन्हा अवैध वाळू उपसा सुरु झाला आहे. दररोज रात्रीच्या वेळेस आव्हाणे येथील गिरणा नदीपात्रात अनेक ट्रॅक्टर व डंपरव्दारे वाळू उपसा सुरु आहे. गिरणा नदीपात्रात गस्तीला ठेवण्यात आलेले पथक देखील आता गायब झाले असून, वाळू माफियांना पुन्हा मोकळे रानच मिळाले आहे. ग्रामस्थ देखील ग्राम पंचायत निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत. यामुळे वाळू उपस्याकडे कोणीही लक्ष घालायला तयार नाही.
मनपाचे ट्विटर, फेसबुक अकांऊंट सुरु करा
जलगाव -मनपा प्रशासनाने सोशल मीडियावर इतर शासकीय कार्यालयाप्रमाणे कोणतेही अधिकृत अकांऊंट सुरु केलेले नाही. जिल्हाधिकारी कार्यालय व इतर कार्यालयांचे अधिकृत व्टिटर व फेसबुक अकांऊंट असल्याने अनेक नागरिक याच अकांऊंटवर आपल्या तक्रारी मांडतात. त्यामुळे मनपा प्रशासनाने आपले अधिकृत अकांऊंट सुरु करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी केली आहे. याबाबतीत मनपा आयुक्तांना निवेदन देखील दिले आहे.
वॉटरग्रेसच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा
जळगाव - मनपाकडून शहराच्या दैनंदिन सफाईचा मक्ता देण्यात आलेल्या वॉटरग्रेस कंपनीला देण्यात आलेल्या ठेक्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार सुरु असून, याबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी जळगाव शहर कॉग्रेसचे सरचिटणीस विेष्णु घोडेस्वार यांनी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली असून, याबाबतीत घोडेस्वार यांनी याबाबत थोरात यांना पत्र देखील पाठविले आहे.