लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : डिसेंबर महिन्यातील वॉटरग्रेसकडून मिळणाऱ्या ‘खुशी’ला काही नगरसेवकांनी नकार दिला होता. मात्र, तरीही नकार देणाऱ्या नगरसेवकांच्या नावावर इतरांनीही रक्कम काढल्याची माहिती नकार दिलेल्या नगरसेवकांनी दिली आहे. यामुळे नगरसेवकांकडून संताप व्यक्त केला जात असून, वॉटरग्रेस व वाटप करणाऱ्यांविरोधात या नगरसेवकांकडून लवकरच मोर्चा उघडण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
वॉटरग्रेसच्या बाबतीत आता दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. ऑगस्ट महिन्यात वॉटरग्रेसने दुसऱ्या टप्प्यातील कामाला सुरुवात केल्यानंतर नगरसेवकांना मॅनेज करण्यासाठी ६० नगरसेवकांना प्रत्येकी १५ हजार रुपयांचा हप्ता दिला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला होता. त्यानंतर या ठेक्यात सुनील झंवर यांचा हिस्सा असल्याचेही समोर आले आहे. वॉटरग्रेस प्रकरणदेखील आता पोलिसांच्या रडारवर येण्याची शक्यता असतानाच डिसेंबर महिन्यात २० ते २५ नगरसेवकांनी वॉटरग्रेसची खुशी घेण्यास नकार दिला होता. मात्र, त्यांच्या नावावर इतरांनी ही रक्कम ढापल्याची माहिती काही नगरसेवकांनी ‘लोकमत’ला दिली.
वॉटरग्रेसविषयी वाढतील तक्रारी
अनेक नगरसेवकांनी आता खुशी घेण्यास नकार दिल्याने वॉटरग्रेसच्या कामाविषयी कमी झालेल्या तक्रारी वाढण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात वॉटरग्रेसविषयी महासभा व स्थायी समितीच्या सभेत नगरसेवकांकडून तब्बल ६८ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तर दुसऱ्या टप्प्यात केवळ तीन तक्रारी नगरसेवकांनी केल्या आहेत. तक्रारी कमी होण्यामागे वॉटरग्रेसकडून मिळणारी ‘खुशी’चेदेखील कारण असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, खुशीला नकार दिल्याने आता नगरसेवकांना रस्त्यावरील कचरा दिसू लागणार आहे.