लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - शहरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा उच्छाद सुरू आहे. गेल्या आठवडाभरात १५ जणांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला आहे. हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असतानाही मनपाकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी मनपा स्थायी समितीची सभा सुरु होण्याआधी शिवसेना नगरसेवक प्रशांत नाईक व भाजपचे नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी मनपा आयुक्तांना चक्क कुत्र्यांची पिल्ले भेट देत प्रशासनाचा निषेध नोंदवला.
जळगाव शहर महापालिकेच्या स्थायी समितीची सभा मंगळवारी सकाळी ११ वाजता महापालिकेतील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी आयुक्त सतीश कुलकर्णी उपस्थित होते. मात्र, सभेला सुरुवात होण्यापूर्वीच सत्ताधारी भाजपचे नगरसेवक नवनाथ दारकुंडे आणि शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी शहरातील मोकाट कुत्र्यांच्या समस्येसंदर्भात आयुक्तांची भेट घेऊन याप्रश्नी तोडगा काढण्याची विनंती केली. मोकाट कुत्र्यांच्या समस्येबाबत वेळोवेळी पाठपुरावा करून देखील प्रशासन कोणत्याही प्रकारची कार्यवाही करत नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष केंद्रित व्हावे म्हणून त्यांनी आयुक्तांना थेट कुत्र्यांची पिल्ले भेट दिली. दोन्ही नगरसेवकांच्या या भूमिकेमुळे सभागृह अवाक झाले. मोकाट कुत्र्यांच्या समस्येसंदर्भात नगरसेवक आयुक्तांचा पाणउतारा करत असताना आरोग्याधिकारी पवन पाटील यांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे आयुक्तांचा चांगलाच पारा चढला. दरम्यान, यावेळी दोन्ही नगरसेवकांनी ठोस कार्यवाहीची अपेक्षा व्यक्त केली.