जळगाव : आजकाल कोण भ्रष्टाचारी नाहीये. सर्वत्र भ्रष्टाचार केला जात आहे, आता आमच्यावरही आरोप चालू आहेत. सबकुछ ओक्के...पच्चास खोके...पण, देशात भ्रष्टाचारी नसलेला माणूस असेल तर तो एकमेव शिक्षक आहे. कोरोना काळात शिक्षकांनी खूप कामे केली, असे प्रतिपादन मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षे जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा झाला नव्हता. अखेर सोमवारी तीन वर्षांचा जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यंदा मराठी शाळांमधील पटसंख्या ही चांगली वाढलेली आहे. अर्थात त्या पक्षातून माणूस या पक्षात आल्यासारखे आहे. शिक्षकांनी आणखे चांगले कार्य करावे, असेही मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. त्याशिवाय २७८ शाळांच्या दुरुस्तीचे कामे झाली असून साडेतीनशेच्यावर शाळांना संरक्षक भिंती बांधण्यात आल्या आहेत. तर १७ शाळांची मॉडेल स्कूल म्हणून निवड झाली असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच इंग्रजी आली पाहिजे. पण, इंग्रजीला डोक्यावर घेऊ नका, असाही सल्ला त्यांनी दिला.