खेडगाव, ता. भडगाव : मागील वर्षाप्रमाणे यावर्षीदेखील सप्टेंबर महिन्यात सुरू असलेल्या पावसामुळे मान्सूनपूर्व व बागायती कापसातील पक्व बोंडे काळी पडली आहेत. कवडी कापूस निघतोय. या आठवड्यात सुरू असलेल्या पावसामुळे तर बोंडातील कापूस भिजून लोंबकळतोय. ओला, लोंबकळलेला कापूसदेखील बोंडावरच सरकीला अंकुर फुटून खराब होण्याऐवजी घरात आणण्यासाठी केविलवाणी धडपड शेतकऱ्यांची सुरू आहे. असा कापूस किलोऐवजी रोजंदारीवरच वेचला जात आहे. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने, विद्यार्थी सर्रास शेतावर जात आहेत. मागील आठवड्यात पावसाने काहीशी उसंत घेतली. पुन्हा १९-२० तारखेपासून पाऊस सुरू झाला आहे. अधून-मधून डोक्यावर ढगांचे ढिगार तुटून पडत आहेत. अशातच कपाशीच्या झाडावर आहे ती काळे बोंडे, कवडी कापूस, भिजलेला कापूस शेतातून घरात आणण्यासाठी मोठी कसरत होत आहे. वेचणीस अधिक खर्च येत आहे. निघणाऱ्या या कापसातून वेचणीचा खर्चदेखील निघणार नाही, असा आर्थिक भुर्दंड बसत आहे.
अति पावसाने कपाशीच्या झाडावरच कैऱ्या सडल्या आहेत. पावसाच्या कमी-अधिक प्रमाणानुसार बागायती कपाशीवर पंचवीस-तीस ते साठ-सत्तर अशा कैऱ्या आहेत. काळ्या पडलेल्या कैऱ्यांना डब्बा म्हटले जाते. असा कापूस व कवडी वेचण्यास अधिक वेळ लागतो. मागील आठवड्यात बऱ्याच क्षेत्रावरील कपाशीची बोंडेही फुटली आहेत. अशा ठिकाणी कापसाची पहिली वेचणी सुरू झाली होती. अशातच पाऊस परीक्षा घेतोय. ‘कवडी, डब्बा, सडलेला, भिजलेला कापूस बोंड काढा, डब्बे फोडा, कवडी निवडा, कापूस सुकवा,’ अशी शेतकऱ्यांचा अंत पाहणारी दमछाक सुरू आहे. सकाळी आठ ते दुपारी दोन यावेळेत १५० रुपये, तर संध्याकाळी पाचपर्यंत २०० रुपये रोज कवडी कापसाच्या वेचणीला आहे. एक मजूर मोठ्या मुश्किलीने १०-२० किलो कापूस वेचतो. इतर वेळेस पहिल्या वेचणीचा माल वजनदार असतो. एक किलो कापूस वेचणीला पाच, सहा, सात रुपये मोबदला मिळतो. एक सशक्त मजूर ३०, ५० किलो तर क्विंटललादेखील हात लावतो; परंतु किलोप्रमाणे कापूस वेचणारे मजूर यावर्षी अद्याप कपाशी चांगली फुटलेली नसल्याने रोजंदारीनेच वेचणीला येत आहेत.
सध्या कोरोनामुळे शाळांचे वर्ग ऑनलाइन सुरू आहेत. शेतकरी व गरीब विद्यार्थ्यांच्या घरात एकच मोबाइल पालकाकडे असतो. आई-वडील शेतावर कापूस वेचणीला गेल्यानंतर अशा घरातील शालेय विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग कसले आलेत? शिवाय ऑनलाइनसाठी मोबाइल नेटचा रिचार्ज मारायलादेखील पैसे नाहीत. म्हणून विद्यार्थी कापूस वेचणीला जात आहेत. यामुळे मात्र शेतकऱ्यांना कापूस वेचणीला मदत होत आहे.
यंदा दिवाळीआधीच वाजणार कापसाचे दिवाळे
मान्सूनपूर्व अर्थात बागायती कापसात अति पावसाने दुसरा बहार जमिनीवर पडला तर पहिल्या बहारातील पक्व बोंडे सडली. आता ही कपाशी पिवळी, लाल पडून पाने करपू लागली आहेत. गळू लागली आहेत. पुन्हा ती हिरवी होतील का नाही? झाली तरी बहार केव्हा लागेल? शेंदरी बोंडअळीची धास्ती आहेच. एरव्ही दिवाळीनंतर देखील दीड-दोन महिना कापूस वेचणीचा हंगाम चालायचा. दिवाळी सुटीत विद्यार्थ्यांना तर मजुरांच्या हातानादेखील बराच दिवस कापूस वेचणीचा हंगाम चालत काम मिळे, यंदा तशी स्थिती नाही.