खान्देश आणि मराठवाड्याच्या हद्दीवर असलेले सातगाव डोंगरी हे गाव अजिंठा पर्वतांच्या रांगाशेजारी वसलेले असून, निसर्गरम्य म्हणून गावाची ओळख आहे. या गावाला निसर्ग नेहमी साथ देत असतो. मात्र, आता निसर्गच शेतकऱ्यांच्या वाइटावर बसला की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
सार्वे, पिंप्री, वाडी, शेवाळे, कडे वडगाव, निंभोरी, आदी परिसरात कापसाचे कधी न होणारे नुकसान झाले असून सातगाव शिवारातील युवराज रामदास पाटील, शिवदास बारकू पाटील, बाबूराव सखाराम मनगटे यांच्या शेतात तर विदारक चित्र आहे. सातगाव शिवारातील सर्वच शेतकऱ्यांची कापूस पिकाची अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जर पाऊस असाच चार- पाच दिवस सुरू राहिला तर सातगाव परिसरातून कापूस पूर्णपणे नष्ट झालेला असेल, अशी भीती निर्माण झाली आहे.
कृषी विभागाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी उच्च स्तरावर प्रयत्न करावा. तसेच विमा कंपन्यांनी ज्या शेतकऱ्यांचा विमा घेतलेला आहे, अशा सर्वच शेतकऱ्यांना १०० टक्के विमा मंजूर करावा, अशी आर्त हाक शेतकऱ्यांनी दिली आहे. २५ रोजीही दिवसभर पाऊस सुरू होता. शनिवारी पशुधनाच्या चाऱ्याची व्यवस्था करून, प्रत्येक बळीराजा आपल्या घरात चिंतातुर होऊन बसलेला दिसून आला.
प्रतिक्रिया
शासनाने आता शेतकऱ्यांचा अंत पाहू नये. तात्काळ पंचनामे करून सरसकट मदत जाहीर करावी अन्यथा शेतकरी कोलमडून पडेल.
-भागवत माधव पवार, शेतकरी,
सातगाव डोंगरी
कापूस पीक तर सडलेच, तसेच आले (अद्रक) पीकही पाऊस जास्त झाल्याने त्यास मर रोगाचा प्रादुर्भाव झाला. आले (अद्रक) पिकाचाही पंचनामा करण्यात यावा.
-रज्जाक रमजान तडवी,
उपसरपंच- सातगाव डोंगरी, ता. पाचोरा