लोकमत न्यूज नेटवर्कभडगाव : सध्या प्रचंड तापमान असून, अशा वातावरणात शेतकऱ्यांनी कापसाची लागवड करू नये, असे आवाहन कृषी विभागातर्फे आयोजित प्रशिक्षणात करण्यात आले.कृषी निविष्ठाधारक विक्रेते यांचे खरीप हंगामपूर्व तालुकास्तरीय गुणवत्ता नियंत्रण प्रशिक्षण व कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन तसेच कीटकनाशकाची सुरक्षित हाताळणी व वापर कार्यशाळा पार पडली. त्यात मान्यवर मार्गदर्शन करताना बोलत होते. अध्यक्षस्थानी रासायनिक खत व कीटक नाशके असोसिएशनचे तालुकाध्यक्ष संजय पाटील होते.व्यासपीठावर तालुका कृषी अधिकारी ए.व्ही. जाधव, कृषी विस्तार अधिकारी डी.एम.निकुंभ, बियाणे कंपनीचे एस.एस.खैरनार, प्रमोद कडलंगे, अशोक परदेशी, कृषी सहाय्यक पी.एन.खाडे, असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रकाश राठोड, पंचायत समितीचे कृषी अधिकारी बी.बी.बोरसे आदी उपस्थित होते.कृषी विस्तार अधिकारी निकुंभ यांनी कृषी निविष्ठेबाबत सूचनांच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन केले. बियाणे कंपनीचे खैरनार यांनी कापूस पिकावरील शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करावी, असे मार्गदर्शन केले. कडलगे यांनी कीटकनाशकांची सुरक्षित हाताळणी व वापर याबाबत मार्गदर्शन केले.सध्या तापमान जास्त आहे. यामुळे कापूस पिकाची लागवड ही तापमान कमी झाल्यानंतर करावी. कमी कालावधीचे बियाणे वाणाची लागवड करावी. अधिकृत कृषी निविष्ठा विक्रेते यांच्याकडूनच बियाणे खरेदी करावे. कापूस लागवडीबाबत शेतकºयांना संपूर्ण तालुक्यात गावागावात मार्गदर्शन करण्यात येईल.-ए.व्ही.जाधव, तालुका कृषी अधिकारी, भडगाव
प्रचंड तापमानात कापूस लागवड करू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 9:54 PM