लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : नोंदणी झालेल्या प्रतिक्षेतील कपाशी उत्पादक शेतकऱ्यांसाठी सीसीआयमार्फतच नगरदेवळे येथील वैष्णवी जिनिंगमध्ये विक्रीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. भोरस व तळेगाव खरेदी केंद्रावर नवीन वाहनांची नोंदणी लवकरच सुरु केली जाणार आहे. पाच अखेर ३१ हजार ९९७ क्विंटल कपाशीची खरेदी करण्यात आली आहे.
तळेगाव व भोरस सीसीआय खरेदी केंद्रावर सद्यस्थितीत कपाशीने भरलेल्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. नवीन नोंदणी सुरु होईल, म्हणून नव्यानेदेखील अनेक वाहने उभी आहेत. शनिवारी १९० वाहने प्रतिक्षेत होती. सोमवारी उशिरापर्यंत या सर्व वाहनांमधील कपाशी मोजण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.
गेल्या नऊ दिवसात मोठ्या प्रमाणात कपाशी खरेदी करण्यात आल्याने भोरस व तळेगाव केंद्रात कपाशी साठविण्यासाठी जागा उपलब्ध नाही. खरेदी केलेल्या कपाशीवर प्रोसेसिंग केले जात आहे. यामुळेच शुक्रवारपासून नविन नोंदणी थांबविल्याचे पत्र सीसीआयने बाजार समितीला दिले होते.