जळगाव : कोरोना या विषाणू संसर्ग आजाराने थैमान घातलेले असताना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाकडून गेल्या आठ-दहा महिन्यात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले.
मिशन बिगेन अगेन अंतर्गत या विभागाकडून विविध १० कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात दोन हजार नागरिकांनी लाभ घेतला. ज्येष्ठ नागरिकांची ऑडीओ कॉलच्या माध्यमातून त्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेण्यात आल्या. या उपक्रमात अंदाजे ५०० व्यक्तींशी संपर्क झाला. या ज्येष्ठ नागरिकांचे समुपदेशन करण्यात येऊन त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मास्क व सॅनिटायझरचे वाटप,घरपोच किराणा, वैद्यकीय सेवा व प्रवास अशी मदतही करण्यात आली. आरोग्यासंबंधी विविध तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शनाखाली महाविद्यालये व परिसंस्थामध्ये ऑनलाईन कार्यक्रम घेण्यात आले त्यात ४०० विद्यार्थ्यांचा सहभाग होता. या उपक्रमांना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु प्रा.ई.वायुनंदन, तत्कालीन कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील, प्रभारी प्र-कुलगुरु प्रा.बी.व्ही.पवार, तत्कालीन प्र-कुलगुरु प्रा. पी.पी.माहुलीकर, प्रभारी कुलसचिव डॉ.एस.आर.भादलीकर यांचे सहकार्य लाभले अशी माहिती आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक प्रा.मनीष जोशी यांनी दिली. या उपक्रमासाठी विभागातील सुभाष पवार, महेश जडे, समाधान अहिरे यांचे सहकार्य मिळाले.