गणेश पदवीचा तर भाईदास बारावीचा विद्यार्थी
अटक केलेल्यांमध्ये गणेश हिरालाल सोनवणे हा धुळे येथील जयहिंद महाविद्यालयात पदवीच्या द्वितीय वर्षाला तर भाईदास शिवलाल पावरा हा शिरपूरच्या महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेत आहे. शिक्षणाच्या वयातच दोघं झटपट पैशाच्या मोहामुळे बनावट दारूच्या धंद्यात उतरले आणि कोठडीची हवा खावी लागली. लॉकडाऊनमधील बेरोजगारीच याला कारण असल्याचे उघड झाले. या दोघांवर यापूर्वी एकही गुन्हा दाखल नाही किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमीही नाही. सुखदेव पूनमचंद पवार याच्या नादी लागून दोघेही या मार्गाकडे वळले. सुखदेव याच्याविरुध्द शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. बनावट दारू निर्मितीत त्याचा हातखंडा आहे.
रेल्वेमार्गामुळे निवडले जळगाव
शिरपूर बनावट दारू निर्मितीचे आगार असल्याने विभागीय उपायुक्त ए.एन. ओहोळ यांनी नाशिकचे पथके या भागात २४ तास नियुक्त ठेवले आहेत. त्यामुळे सतत कारवाया होत असल्याने व जळगावहून रेल्वेची सोय असल्यामुळे या तरुणांनी शिरपूरऐवजी जळगाव हे ठिकाण निवडले. येथेच दारू निर्मिती करून ती खोक्यांमध्ये व त्यावर वेगळे आवरण तयार करून प्रवासी बोगीतून सीटच्या खाली खोके ठेवून दारूची तस्करी केली जात होती. पहिला एक टप्पा यशस्वी झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्याचीही दारू तयार झाली होती; मात्र त्याआधीच भांडाफोड झाला.
कोट...
या गुन्ह्यात आतापर्यंत सहा जणांना अटक केली आहे. आणखी दोन जण फरार आहेत. अटकेतील सर्वांना ८ रोजी न्यायालयात हजर केले जाईल. येथे तयार होणारी दारू रेल्वे मार्गाने गुजरातमध्ये जात असल्याची कबुली अटकेतील संशयितांनी दिली आहे. स्पिरीट कोठून आणले जाते याची आता चौकशी सुरू आहे. यात तपासात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे.
-चंद्रकांत पाटील, निरीक्षक, भरारी पथक, राज्य उत्पादन शुल्क