लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : एरंडोल तालुक्यातील वैजनाथ वाळू गटातून वाळू उपशाविषयी करण्यात आलेल्या तक्रारीनुसार शुक्रवारी झालेल्या मोजणीवर तक्रारकर्ते ॲड. विजय भास्कर पाटील यांनीच आक्षेप घेतला आहे. ही मोजणी मान्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. पंचनाम्यावर त्यांनी तशी हरकत लिहिली असून, याविषयी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन तक्रार करणार असल्याचे ॲड. पाटील यांनी सांगितले. दरम्यान, या मोजणीचा अहवाल दोन ते तीन दिवसांत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महसूल विभागाला सादर करण्यात येणार आहे.
एरंडोल तालुक्यातील वैजनाथ वाळू गटातून बेसुमार वाळूचा उपसा सुरू असून, या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडत आहेत. या सर्व प्रकाराची चौकशी करण्यासाठी महसूल विभागाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत इन कॅमेरा मोजमाप करण्यात यावे, अशी मागणी ॲड. विजय भास्कर पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. या मागणीनुसार महसूल उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यांची समिती नियुक्त करण्यात आली. या समितीने शुक्रवारी वैजनाथ वाळू गटाच्या ठिकाणी जाऊन सकाळी साडेआठ वाजता मोजणीला सुरुवात केली. दुपारी साडेबारा वाजेपर्यंत ही मोजणी सुरू होती.
तंत्रशुद्ध मोजणी नाही
वैजनाथ वाळू गटाची मोजणी करण्यासाठी आलेल्या समितीतील सदस्यांच्या उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे एरंडोल येथील शाखा अभियंता नितीन पाटील यांनी मोजणीला सुरुवात केली. त्यावेळी त्यावर ॲड. पाटील यांनी आक्षेप घेतला. नितीन पाटील यांनी सोबत केवळ एक मोजणीचा टेप आणला व नदीपात्रातूनच एक काठी उचलून त्याद्वारे खोली मोजण्यास सुरुवात केली. त्यामुळे ही मोजणीची पद्धत योग्य नसून तांत्रिकरीत्या वाळू उपसाची मोजणी झाली पाहिजे, असे ॲड. पाटील यांनी यावेळी सांगितले. प्रत्यक्षात अद्ययावत मशिनरी, दुर्बीण उपलब्ध असतानादेखील एक काठी व टेपच्या साह्याने मोजणी कशी होऊ शकेल, असा प्रश्न तक्रारकर्ते ॲड. पाटील यांनी उपस्थित केला.
अहवाल आल्यानंतर उपशाची माहिती
शुक्रवारी वैजनाथ वाळू गटाची मोजणी झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दोन ते तीन दिवसांत अहवाल सादर केला जाणार आहे. हा अहवाल आल्यानंतरच या वाळू गटातून किती वाळू उपसा झाला हे समजू शकेल, अशी माहिती चौकशी समितीचे अध्यक्ष तथा उपजिल्हाधिकारी (महसूल) रवींद्र भारदे यांनी दिली.