जळगाव : सिंधी कॉलनीतील कंवर नगर व इच्छा देवी चौकात पकडलेल्या २ लाख ९८ हजार ६३६ रुपयांच्या गुटखा प्रकरणात अटकेत असलेल्या रमेश
जेठानंद चेतवाणी व त्यांची पत्नी सिमरन या दोघांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्या.व्ही.सी.जोशी यांनी १३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाने बुधवारी ही कारवाई केली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारतर्फे ॲड.प्रिया मेढे यांनी काम पाहिले.
तांबापुरात सट्टा अड्डयावर पोलिसांची धाड
जळगाव : शामा फायर कॉम्प्लेक्ससमोर सुरु असलेल्या सट्टा अड्डयावर परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक नितीन गणापुरे यांच्या पथकाने गुरुवारी दुपारी धाड टाकली असता तेथे काही जण चिठ्ठया लिहून त्याचे आकडे मोबाईलद्वारे पाठवित असल्याचे आढळून आले. या प्रकरणी सहा जणांविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून १० हजार ९८० रुपये रोख हस्तगत करण्यात आले आहे. तांबापुरातील हमीद चौकात पानटपरीत बसून शेख आसिफ उर्फ डल्ला शेख अन्वर हा मोबाईलवर चिठ्ठया पाठवत होता. शेख रईस शेख मनवर, शेख जुनेद शेख जब्बार, अक्रम शेख तस्लीम व प्रल्हास सोमा वाघ यांच्याविरुध्द कारवाई करण्यात आली.