जळगाव : आपली रेल्वेत खूप ओळख असल्याची थाप मारून मध्य प्रदेशातील पती-पत्नीला रेल्वेत नोकरीला लावून देतो, असे सांगून हरीश चिंतामण आटोळे (रा. देवराम नगर, जळगाव) याने २१ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मध्य प्रदेशातील अलीराजपूर पोलिसांनी शनिवारी त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने अटक केली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हरीश आटोळे याचे नातेवाईक मध्य प्रदेशातील अलीराजपूर येथे वास्तव्याला आहेत. त्यामुळे २५ वर्षांपूर्वी हा त्या नातेवाइकांकडे गेला असता त्यांच्या शेजारी राहणारे जितेंद्र गेंदालाल वाणी व त्यांची पत्नी अंकिता यांच्याशी ओळख झाली होती. त्यामुळे हरीश जेव्हाही आलीराजपूर येथे जायचा, तेव्हा तो त्यांना भेटायला जायचा. त्यामुळे त्यांच्यात चांगले संबंध प्रस्थापित झाले होते. मार्च २०१९ मध्ये तो तेथे गेला असता त्याने वाणी यांच्याकडे रेल्वेत नोकरीचा विषय काढला. आपली तेथे खूप ओळख असून आपलेच चालते, असे सांगून रेल्वे अधिकाऱ्यांना दाखविण्यासाठी प्रमाणपत्रे व इतर कागदपत्रे घेतली. त्यानंतर २८ मार्च २०१९ रोजी सुखलाल भीला खैरनार याच्या बँक खात्यावर ३५ हजार रुपये व नंतर २९ मार्च रोजी १५ हजार रुपये जमा करायला सांगितले. नंतर ८ जून रोजी १ लाख ६० हजार रुपये रोख घेतले. त्यानंतर वेळोवेळी एकूण २० लाख ९६ हजार ५०० रुपये त्याने नोकरीच्या नावाने घेतले. नोकरी लागत नसल्याने वाणी दाम्पत्याने पैशाची मागणी केली असता मी सात जणांचे काम करणार आहे, त्यांच्याकडून ७५ लाख रुपये मिळणार आहेत व ते मिळाले की परत करू, अशा भूलथापा देऊ लागला. आपली फसवणूक झाली आहे व पैसे मिळत नसल्याचे पाहून वाणी दाम्पत्याने पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून १३ जानेवारी रोजी अलीराजपूर येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
एलसीबीची घेतली मदत
अलीराजपूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक धीरेश धारवा व मनीष कुमार यांचे एक पथक शनिवारी जळगावात आले. अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांची भेट घेऊन घटनेची माहिती कथन केली. गवळी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्याशी संपर्क साधून मदत करण्याबाबत सूचना केल्या. विजयसिंग पाटील, अशरफ शेख, नरेंद्र वारुळे या तिघांनी आटोळे याची माहिती काढून पथकासह दुपारी गुजराल पेट्रोल पंपाच्या जवळून ताब्यात घेतले.