जळगाव : कोरोनाबाधित मालती चुडामण नेहते (८२) या वृध्देला वॉर्ड क्र. ७ मधील स्वच्छतागृहात जाताना एका दाम्पत्याने पाहिले होते असे गुरुवारी पोलीस तपासात पुढे आले आहे. मात्र ही महिला कोणत्या दिवशी व कोणत्यावेळी स्वच्छतागृहात गेली तेथे कशी आली हे अद्यापही अनुत्तरीतच आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित डॉक्टर व कर्मचारी कोण अद्यापही निष्पन्न झालेले नाही.कोरोना रुग्णालयातून २ जून पासून बेपत्ता असलेल्या मालती नेहते या १० रोजी सकाळी वॉर्ड क्र. ७ च्या स्वच्छतागृहात मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी विशेष वैद्यकिय अधिकारी डॉ.स्वप्नील चंद्रकांत कळसकर (३७) यांच्या फिर्यादीवरुन वॉर्ड क्र.७ मधील डॉक्टर, परिचारिका, सफाई कर्मचारी व इतर संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्याविरुध्द बुधवारी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांनी गुरुवारी पुन्हा सकाळी रुग्णालयात जावून चौकशी केली. वॉर्ड क्र.७ मध्ये २ तारखेपासून दाखल असलेल्या एका दाम्पत्याने नेहते या आमच्यासमोर स्वच्छतागृहात गेल्याचे पोलिसांना सांंगितले. मात्र तारीख व वेळ त्यांनी सांगितली नाही. या दाम्पत्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर पुन्हा त्यांच्याकडून माहिती घेऊ असे पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांनी सांगितले. वॉर्ड तसेच इतर ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज देखील तपासण्यात आले, मात्र अजून ठोस अशी काहीच माहिती मिळालेली नाही.
‘त्या’ वृध्देला स्वच्छतागृहात जाताना दाम्पत्याने पाहिले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 11:39 AM