जळगाव : बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या व्यवसायरोध भत्त्याच्या वसुलीस औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली आहे. याप्रकरणी महाराष्ट्र शासन, शिक्षण सहसंचालक, कुलसचिव, वित्त व लेखाधिकारी यांना न्यायालयाने नोटीस बजावली आहे.
विद्यापीठातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनाली कांबळे यांच्या वेतन निश्चितीसाठीचा प्रस्ताव विद्यापीठाच्यावतीने शिक्षण सहसंचालक कार्यालयास पाठविण्यात आला होता. त्यावेळी कांबळे यांना अदा करण्यात आलेला व्यवसायरोध भत्ता चुकीचा असून तो वसूल करण्यात यावा, असे पत्र सहसंचालक कार्यालयातून पाठविण्यात आले होते. परिणामी, याविरुध्द डॉ. कांबळे यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. नुकताच न्यायालयात या प्रकरणी युक्तिवाद झाला असून महाराष्ट्र शासन, शिक्षण सहसंचालक, कुलसचिव, वित्त व लेखाधिकारी यांना नोटीस बजावली असून पुढील सुनावणी १५ फेब्रुवारी रोजी होणार आहे. तोपर्यंत व्यवसायरोध भत्त्याची कोणतीही वसुली करण्यात येऊ नये, असा स्पष्ट मनाई आदेश न्यायालयाने दिला आहे. डॉ. कांबळे यांच्यावतीने ॲड. चैतन्य धारूरकर यांनी कामकाज पाहिले.