जळगाव : न्यायालयाच्या आवारात असलेल्या झाडाची जीर्ण झालेली फांदी अचानक कोसळल्याने झाडाखाली बसलेले अॅड.मनोज जगताप हे वकील बालंबाल बचावल्याची घटना गुरुवारी सायंकाळी पाच वाजता घडली. गुरुवारी संध्याकाळी न्यायालयीन कामकाज आटोपल्यानंतर अॅड.मनोज जगताप, अॅड.मिलिंद बडगुजर, अॅड.जगदीश पाटील आदी वकील मंडळी चहा पिण्यासाठी न्यायालयाच्या दुस:या क्रमांकाच्या गेटकडे (भारत कृषक भवनाच्या समोर) असलेल्या झाडाखाली थांबले होते. शकील खान हा चहावालाही ग्राहकांना चहा घेवून आला होता. त्याच वेळी झाडाची मोठी फांदी अचानक कोसळली. अॅड.जगताप यांच्या बाजुलाच फांदी कोसळल्याने दैव बलवत्तर म्हणून या घटनेतून ते बचावले. त्यांच्या शेजारीही अन्य वकील व ग्राहक उभे होते. दरम्यान, या ठिकाणाहून अनेक वकील व नागरिकांची वर्दळ असते. न्यायालय आवारात झाडांची संख्या मोठी आहे, त्यातील अनेक झाडांच्या फांद्या जीर्ण झालेल्या आहेत. जिल्हा रुग्णालयातील घटनेचा बोध घेवून धोकेदायक झाडे व फांद्या तोडण्याची मागणी यानिमित्ताने पुढे आली आहे.महापालिका गंभीर नाहीच जिल्हा रूग्णालयात संगीता सोनवणे या महिलेच्या अंगावर जीर्ण वृक्ष कोसळल्याने 27 डिसेंबर रोजी मृत्यू झाला होता़ याघटनेनंतर तरी महापालिकेने याकडे लक्ष देणे अपेक्षित होत़े मात्र लेखी अर्ज करूनही फाईल पाठविली आहे, एक दोन दिवसात कार्यवाही करतो, अशी उत्तरे भवानीपेठेतील रहिवाशांना दिले जातात. त्यामुळे नाराजी आहे.
न्यायालयात जीर्ण फांदी तुटली
By admin | Published: February 03, 2017 1:09 AM