लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील कोविड केअर सेंटरही जवळपास फुल्ल होण्याच्या मार्गावर आहे. या ठिकाणी ४७० बेडपैकी ४२८ बेडवर मंगळवारी रुग्ण दाखल होते. दुसरीकडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व कक्ष फुल्ल झाल्याने नेमक्या उपाययोजना काय कराव्यात, याच्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि सीईओ डॉ. बी.एन. पाटील यांनी जीएमसीत बैठक घेऊन पाहणी केली.
गंभीर रुग्णांचे प्रमाण वाढल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेमक्या कोणत्या कक्षात कशा प्रकारे आणखी रुग्ण दाखल करता येऊ शकतात, याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जि. प. सीईओ डॉ. बी.एन. पाटील यांनी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या दालनात बैठक घेतली व काही कक्षांमध्ये पाहणीही केली. या वेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण उपस्थित होते. काही भाग कोविड आणि काही भाग नॉन कोविड अशा पद्धतीने नियोजन करता येऊ शकते का? याबाबत विचारविनिमय सुरू असल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यात ८ डीसीएचसी सुरू
जिल्ह्यातील पाच डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आधीपासूनच सुरू होते. यात मंगळवारी तीन केंद्रांची भर पडली. यासह जिल्ह्यातील ८ कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहेत. मात्र, अधिक प्रमाणात नागरिक होम आयसोलेशनमध्ये राहत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी सांगितले.
अशी आहे स्थिती
शहरातील सक्रिय रुग्ण
२,३१७
जिल्ह्यातील सक्रिय रुग्ण
५,१८९
जीएमसीतील बेड : १२१
जीएमसीतील रुग्ण : १२१
इकरा सेंटरमधील बेड : १००
इकरा सेंटरमधील रुग्ण : १००