लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोविड कक्ष फुल्ल झाला आहे. दुसरीकडे इकरा वैद्यकीय महाविद्यालयातही शंभर बेड फुल्ल झाले असून आता लक्षणे नसलेल्या रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये हलविले जात आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने आता यंत्रणेसमोरही प्रश्न निर्माण झाला आहे.
केवळ शासकीय अभियांत्रिकी येथील कोविड केअर सेंटर हा एकमेव शासकीय पर्याय सध्या यंत्रणेसमोर आहे. शहरात पंधरा खासगी कोविड हॉस्पिटलला परवानगी देण्यात आली होती. कोरोना वाढू लागल्यानंतर अचानक परवानगीसाठी येणाऱ्यांची संख्या वाढून निकष तपासून प्रशासनाने तातडीने या रुग्णालयांना परवानगी दिली आहे. दरम्यान, या रुग्णालयातही जागा मिळत नसल्याच्या काही तक्रारी समोर येत आहे. दुसरीकडे जीएमसीत सीथ्री कक्षातील पूर्ण ७५ बेड फुल्ल झाले आहेत. ज्यांना सौम्य लक्षणे आहेत, अशांना कोविड केअर सेंटरमध्ये तर गंभीर रुग्णांना जागा नसल्याने डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात हलविण्यात येत आहे. जीएमसीतून दिवसभर रुग्णांचे स्थलांतर सुरूच असल्याचे चित्र आहे.
तीन विद्यार्थी, एक कर्मचारी बाधित
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शिक्षण घेणारे वसतिगृहात राहणारे तीन विद्यार्थी तसेच जीएमसीतील एक कर्मचारी कोरोना बाधित आढळून आले आहेत. चाळीस विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी तीन विद्यार्थी बाधित आढळून आले होते. त्यांना लक्षणे सौम्य असल्याने वसतिगृहातच स्वतंत्र ठेवण्यात आले होते.