रावेर : भारतीय वैद्यकीय अणुसंशोधन परिषदेतर्फे तालुक्यातील तांदलवाडी येथे दुसऱ्या टप्प्यातील सिरो सर्व्हेक्षणासाठी मंगळवारी ४० जणांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले. त्यातील सिरममधून शरीरात अॅण्टीबॉडीज प्रतिपिंड तयार झालेत किंवा नाही ? व झालेत तर त्याचे प्रमाण किती? यासंबंधी संशोधन करून कोविडवर लस तयार करण्यासाठी व राज्य सरकारांना पुढील उपाययोजनांसाठी मार्गदर्शक निर्देश देण्यासाठी या सिरो सर्व्हेक्षणाचा लाभ होणार असल्याची माहिती भारतीय वैद्यकीय अणुसंशोधन परिषदेचे पर्यवेक्षक डॉ. अजित बुचडे यांनी ‘लोकमत’ ला दिली.रावेर तालुक्यातील तांदलवाडी येथील जि. प. प्राथमिक शाळेच्या इमारतीत केंद्र सरकारद्वारे आयोजित भारतीय वैद्यकीय अणुसंशोधन परिषदेच्या सिरो सर्व्हेक्षणाचा दुसरा टप्पा मंगळवारी पार पडला. तांदलवाडी गावाचे चार भागात विभाजन करून प्रत्येक भागातील काही घरांची विनानुक्रमाने निवड करण्यात आली. त्यात कोविड लक्षणे असलेल्या वा नसलेल्या कुटूंबातील सदस्यांची अकस्मात निवड करून ४० रक्ताचे नमुने घेण्यात आले.याकामी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवराय पाटील, थोरगव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कुणाल पाटील व डॉ. तुषार चौधरी व आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
कोविडची लस तयार करण्यासाठी होणार मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 6:25 PM