लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील महापालिकेच्या ८ केंद्रांवर कोविशिल्ड लस उपलब्ध राहणार आहे. दरम्यान, चेतनदास मेहता रुग्णालयात १८ ते ४४ वयोगटासाठी कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस उपलब्ध करून देण्यात आला होता. एकाच दिवसात हे डोस संपले आहे. रविवारी दोनही लसींचे डोस येण्याची शक्यात आहे.
चेतनदास मेहता रुग्णालयात सकाळच्या सुमारास काहीशी गर्दी झाली हेाती. यात १८ ते ४४ वयोगटासाठी वरती स्वतंत्र तर ४५ वर्षावरील नागरिकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली हेाती. त्यामुळे हळूहळू गर्दी ओसरली होती. दुपारी साडेबारा वाजेपर्यंत १८ ते ४४ वयोगटात १४७ जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला होता. शासकीय केंद्रावरील गर्दी कमी झाल्यामुळे आता १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणाची मागणी समोर येत आहे. दरम्यान, येत्या आठवडाभरात हे लसीकरण सुरू होण्यासंदर्भात हालचाली सुरू असल्याचे स्थानिक पातळीवरून समोर आले होते.
रोटरीला आज कोव्हॅक्सिन
रोटरी भवनातील केंद्रावर १८ ते ४४ तसेच ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी दुसऱ्या डोससाठी कोव्हॅक्सिन उपलब्ध राहणार आहे. तर रेडक्रॉस सोसायटीच्या केंद्रावर कोविशिल्ड लस राहणार आहे.