लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हाभरात झालेल्या एकूण लसीकरणापैकी तब्बल ९० टक्के लोकांनी कोविशिल्ड लस घेतली आहे. कोव्हॅक्सिनचे प्रमाण त्या मानाने अत्यल्प आहे. आता मात्र, कोविशिल्डचा पहिला डोस बंद असल्याने पर्यायांचा विचार न करता जी मिळेल ती लस, याप्रमाणे कोव्हॅक्सिन घेण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढली आहे.
जिल्ह्यात कोविशिल्डच्या तुलनेत कोव्हॅक्सिनचा पुरवठा हा अगदी १० टक्केदेखील झालेला नाही. हा एक मुद्दा या लसीकरणातील तफावतीमागे दिसून येत आहे. केंद्रांचा विचार केला असता शहरातील ११ केंद्रांपैकी ९ केंद्रांवर कोविशिल्ड उपलब्ध असते तर केवळ दोनच केंद्रांवर कोव्हॅक्सिन मिळते. मात्र, आता सर्व कंपन्यांनी लसीकरण बंधनकारक केल्याने कर्मचारी वर्गाची लसीकरणासाठी तारांबळ उडत आहे. अनेकांचा यात पहिला डोस घेतला गेलेला नाही, त्यांना आता कोविशिल्डचा पहिला डोसच मिळत नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा स्थितीत कोव्हॅक्सिनचा मात्र, पहिला डोस उपलब्ध असल्याने कोव्हॅक्सिन घेण्यासाठी गर्दी वाढली आहे. त्यामुळे अन्य केंद्रांपेक्षा महापालिकेच्या चेतनदास मेहता रुग्णालयाच्या केंद्रावर गर्दी वाढली आहे.
५ लाख लोकांचा दुसरा डोस बाकी
पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेणे बाकी असलेल्यांची संख्या अद्यापही मोठी आहे. गेल्या महिनाभरापासून पहिला डोस बंदच असून दुसऱ्या डोसचे टार्गेट पूर्ण करण्याचे नियोजन शासनाकडून सुरू आहे. जिल्ह्यातील एकत्रित ५ लाख १७ हजार ७९१ नागरिकांचा अद्यापही दुसरा डोस बाकी आहे. यात कोव्हॅक्सिनचा कालावधी कमी असल्याने या लसीचा दुसरा डोस बाकी असलेल्यांची संख्या त्या मानाने कमी आहे. २८,१६५ नागरिकांचा कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस बाकी आहे.
असे आहे चित्र
कोविशिल्डचे आलेले डोस : ७,८०,६३०
किती लोकांना लस दिली : ८,४६,३६५
कोव्हॅक्सिनचे आलेले डोस : ९७,०१०
किती लोकांना लस दिली : ९७,६२२
एकूण लसीकरण : ९,४३,९८७