लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना लसीकरणाच्या पहिल्या दिवशी दुपारी लस घेतल्यानंतर, दोन परिचारिकांना रात्री ९ वाजेच्या सुमारास तर एका चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला रविवारी सकाळी थंडी व ताप आल्याने त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असून, एक-दोन दिवस त्यांना निगराणीखाली ठेवण्यात येणार असल्याचे समजते. दरम्यान, चाळीसगावातही एकाला त्रास झाल्याने दाखल करण्यात आले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह जिल्ह्यात सात केंद्रांवर शनिवारी कोरोनाच्या कोविशिल्ड या लसीचे नियमानुसार लाभार्थ्यांना डोस देण्यात आले. यात जामनेर येथील एक महिला वगळता अन्य कर्मचाऱ्यांना किरकोळ स्वरूपाची लक्षणे जाणवली होती. मात्र, गंभीर लक्षणे कोणालाही शनिवारी सायंकाळपर्यंत नव्हती. यात जीएमसीमध्ये देान परिचारिकांनी दुपारी दोन वाजेच्या सुमारास लस घेतली होती. त्यांना रात्री ९ वाजेच्या सुमारास अचानक थंडी वाजायला लागली व तापही आला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसाच त्रास रविवारी पहाटे एका चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना झाल्याने त्यांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, ही सौम्य लक्षणे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे असून, तिघांची प्रकृती सामान्य असल्याचे सांगितले जात आहे.
जळगाव २०व्या क्रमांकावर
लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी जळगावात अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला. राज्याच्या एकत्रित आकडेवारीत पहिल्या दिवशीच्या लसीकरणात जळगाव जिल्हा २०व्या स्थानावर राहिला. जळगावात सर्वाधिक पारोळा रुग्णालय ८९, शहरातील डी. बी. जैन रुग्णालय ८३, चोपडा उपजिल्हा रुग्णालय ६७, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय ५९, जामनेर उपजिल्हा रुग्णालय ५१, चाळीसगाव ग्रामीण रुग्णालय ४८, भुसावळ ग्रामीण रुग्णालय ४६ असे पहिल्या दिवशी लसीकरण झाले आहे. केवळ ४४३ आरोग्य कर्मचाऱ्यांनीच लस घेतली.
म्हणून लस घेतल्यावरही नियम महत्त्वाचे : तज्ज्ञ
लस घेतल्याने शरीरात अँटिबॉडीज तयार होतील. त्या साधारण सहा महिने तुमच्या शरीरात राहू शकतात. कोरोना होणार नाही, याची शाश्वती नसली, तरी कोरोना झाला, तरी त्याचे परिणाम मात्र सौम्य राहतील, असा एकत्रित अभ्यास सांगतो, असे औषध वैद्यक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. भाऊराव नाखले यांनी सांगितले. त्यामुळे लस घेतल्यावरही आपल्याला पूर्वीचे नियम कायम पाळायचे आहेत. त्यात मास्क, हात धुणे, एकमेकांपासून सुरक्षित अंतरावरच बोलणे या नियमांचा त्या समावेश असल्याचे डॉ.नाखले यांनी सांगितले.
लक्षणे लपवू नका
डी. बी. जैन रुग्णालयातही लस घेतलेल्या काही आरोग्य कर्मचाऱ्यांनाही डोकेदुखी, मळमळ, थंडी, अंगदुखी अशी लक्षणे समोर आली असून, रविवारी यातील अनेकांनी डॉक्टरांशी संपर्कही साधला. दरम्यान, लस दिल्यानंतर अशी साधारण लक्षणे समोर येतीलच, त्यामुळे न घाबरता लोकांनी याबाबत सांगावे, काहीही लपवू नये, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
कोट
जिल्ह्यात चार ते पाच कर्मचाऱ्यांना थंडी, ताप, अंगदुखीचा त्रास जाणवला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही लक्षणे सौम्य असून, एक दोन दिवसांत त्यांना डिस्चार्जही देण्यात येईल.
- डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक