विलास बारीजळगाव : सर्वसाधारण परिस्थितीत उन, वारा आणि पावसात घरासमोरील वडाच्या झाडाने आसरा दिला. वडाच्या झाडाच्या उपकाराची परतफेड त्याच झाडाची लागवड करीत पाचोरा तालुक्यातील कळमसरा येथील दत्तात्रय तावडे यांनी करायचे ठरविले. ‘ठेवु दुरदृष्टी...रक्षु निसर्ग सृष्टी’ चा संदेश देत तावडे यांनी गाव परिसरात वडाच्या २४५ वृक्षांची लागवड तर केलीच त्यासोबत स्वतंत्र नर्सरी तयार करीत ३० हजार वडांच्या रोपाची निर्मिती केली आहे.पाचोरा तालुक्यातील कळमसरा येथील दत्तात्रय तावडे यांचे वडाच्या झाडाजवळ लहानसे घर होते. याच झाडाखाली त्यांचे बालपण गेले. सर्व ऋतूंमध्ये वडाच्या झाडाने त्यांना आसरा दिल्याने म्हणूनच त्यांनी वड, पिंपळ, उंबर या देशी झाडांचा प्रचार व प्रसार सुरु केला. सद्यस्थितीला या रोपांची निर्मिती करीत पर्यावरणाच्या संवर्धनासाठी ते हातभार लावत आहेत.
बी पासून तयार होते वडाचे रोपवडाच्या रोपाची निर्मिती ही अवघड बाब असते. काही नर्सरीचालक हे वडाच्या फांद्यांपासून रोपाची निर्मिती करतात. मात्र तावडे हे वडाच्या झाडाची फळे आणि त्यापासून रोपांची निर्मिती करीत असतात. त्यासाठी विशिष्ट ऋतूची वाट पहावी लागते. वर्षाकाठी सात ते आठ हजार वडाच्या रोपांची ते निर्मिती करीत असतात. त्यासोबत पिंपळ, उंबर या रोपांचीदेखील निर्मिती करतात व अत्यंत अल्प दरात ते देतात.
आत्याने दिली दोन एकर जागातावडे यांच्या घरची परिस्थिती जेमतेम आहे. वडिल सालदारकी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित असत. तावडे यांना निसर्ग भटकंती, गाव परिसरात झाडे लावणे, शाळा व महाविद्यालयात देशी वृक्षांबाबत जनजागृती करणे, पक्षीनिरिक्षण करणे याची आवड असल्याने त्यांच्या आत्यांनी दोन एकर जमीन दिली. तत्कालिन वनअधिकारी डी.आर.पाटील यांनी देशी वृक्षांच्या नर्सरीसाठी प्रोत्साहन दिल्यानंतर पर्यावरण संवर्धनाच्या कामाला सुरुवात झाली.
३० हजार रोपांची निर्मितीपर्यावरण संवर्धनासोबतच कुटुंबाचा चरितार्थ चालावा म्हणून तावडे यांनी नर्सरी सुरु केली. प्रत्येक वर्षी वड, पिंपळ आणि उंबर या झाडांची मागणी वाढू लागली. आतापर्यंत तावडे यांनी सुमारे ३० हजार वडाच्या रोपांची वनविभाग, शाळा व महाविद्यालयांसाठी निर्मिती केली. तर परिसरात २०० ते २५० वडाच्या रोपांची लागवड करून संगोपन केले आहे.नववी पास तावडे यांची संतसाहित्यातून जनजागृतीतावडे यांच्या पर्यावरण संवर्धनाची दखल घेत विविध संस्था व शासनाकडून त्यांना वृक्ष मित्र, वसुंधरा मित्र पुरस्कार, पक्षी मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अवघे नववीचे शिक्षण झालेले तावडे हे निसर्ग रक्षणाबाबत संत साहित्याच्या माध्यमातून जनजागृती करीत आहेत.वड, पिंपळ व उंबरचे काय आहेत फायदेपर्यावरण पूरक असलेल्या वड, पिंपळ व उंबर (औदुंबर) या झाडांना अध्यात्मिक, भौगोलिक, औषधी गुणधर्म आहेत. सर्व झाडांची पानझड होत असताना हे झाडे सदाहरित असतात. ‘ग्लोबल वॉर्मिंग’च्या संकटाचा सामना करण्यासाठी देशी झाडांशिवाय पर्याय नाही. महावृक्षांच्या गणणेत असल्याने मोठ्या वादळात हे वृक्ष उन्मळून पडत नाही. या वृक्षांमध्ये देवतांचा अधिवास असल्याची श्रद्धा असल्याने त्यावर कुºहाड चालविली जात नाही.
माझ्या घराजवळील वडाच्या झाडामुळे मला बालपण अनुभवता आले. उन, वारा व पावसात या झाडाने मला आसरा दिला. या झाडाच्या उपकाराची परतफेड म्हणून वड, पिंपळ, उंबर या देशी वृक्षांबाबत जनजागृती व निर्मिती सुरु केली आहे. आतापर्यंत ३० हजारावर वडाच्या रोपांची निर्मिती केली तर सुमारे २४५ वृक्षांची लागवड केली.-दत्तात्रय तावडे, पर्यावरण अभ्यासक