जळगाव ( मुक्ताईनगर ) : शहरातून नागेश्वर मंदिराकडून श्रीक्षेत्र कोथळी येथील जुन्या मुक्ताबाई मंदिराकडे जाण्याच्या रस्त्यावरील नादुरुस्त असलेल्या पुलासाठी १ कोटी २५ लक्ष रुपये आणि रावेर तालुक्यातील दसनूर कुरखेडा गावाजवळील मोठ्या पुलासाठी ६ कोटी ५० लक्ष रुपये असे एकूण ७ कोटी ७५ लक्ष रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजूर केले आहे. या दोन्ही पुलांच्या कामाबाबत माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे व मुक्ताईनगरचेआमदार चंद्रकांत पाटील यांच्या कडून आलेल्या प्रसिद्धिपत्रकावरून तरी श्रेयवाद रंगल्याचे दिसून येत आहे.
याबाबत माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्याकडून आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, १३ मे १९ रोजी तत्कालीन बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे या पुलांसाठी निधीची मागणी करण्यात आली होती व त्याच काळात नाबार्डकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता तसेच रावेर तालुक्यातील पुनखेडा पातोंडी येथील तुटलेल्या पुलासाठी ४ कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे. ही कामे लवकरात लवकर मंजूर व्हावी अशी नागरिकांची मागणी होती. या मागणीनुसार माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या पाठपुरवठ्यामुळे ही कामे मंजूर करण्यात आली असल्याचा दावा खडसे यांच्याकडून आलेल्या प्रसिद्धीपत्रकात करण्यात आला आहे.
तर दुसरीकडे आमदार पाटील यांच्या कडून आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघातील जुन्या मुक्ताबाई मंदिराला जोडणाऱ्या पुलासाठी व दसनुर आणि पूनखेडा पूलांसाठी एकूण ७ कोटी ७५ लक्ष रुपये मंजूर झाले असून नागरिकांच्या मागणीनुसार आमदार चंद्रकांत पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री व मुख्यमंत्री यांच्याकडे संत मुक्ताई यात्रोत्सवा पूर्वी हा रस्ता पूल पूर्णपणे दुरुस्त करण्यात यावा म्हणून निधीची मागणी केली होती. जानेवारी महिन्यात देखील त्यांनी सतत पाठपुरावा करून हा निधी साठी प्रयत्न केल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
दरम्यान, मुक्ताईनगर येथे मागील महिन्यात झालेल्या विधानसभेच्या आढावा बैठकीत आमदार चंद्रकांत पाटील यांनी सर्व अधिकाऱ्यांसमोर व मतदारसंघातील नागरिकांसमोर सदर फुलाचे काम तात्काळ पूर्ण करण्यासाठी निधी प्राप्त व्हावा म्हणून प्रयत्नशील असल्याचेही सांगितले होते.
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघावर गेल्या तीस वर्षांपासून असलेल्या माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या वर्चस्वाला आताच्या विधानसभा निवडणुकीत धक्का देत आमदार चंद्रकांत पाटील हे निवडून आल्यानंतर श्रेय वादाची ही लढाई अपेक्षितच होती व या श्रेय वादाचा प्रवास जुन्या मुक्ताबाई मंदिराकडे जाणाया पुलाच्या कामावरुन आणि दसनूर जवळील पुलाच्या कामावरून सुरु झाल्याचे दिसून येत आहे.