जळगाव : जिल्हा बँकेची थकबाकीदार, बहुचर्चित श्री महावीर अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळातील सुरेंद्र नथमलजी लुंकड, महेंद्र दुर्लभ शहा, मनीष ईश्वरलाल जैन, सुभाष सागरमल सांखला या चौघा थकबाकीदार संचालकांचीच प्रशासक म्हणून संस्थेवर नियुक्ती करण्यात आली आहे. थकबाकीदारांकडेच या संस्थेची सूत्रे सोपविली गेल्याने जिल्हा निबंधकांच्या या निर्णयाविषयी सभासदांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
श्री महावीर अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीने जिल्हा बँकेकडून आठ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्या कर्जाची वेळेत परतफेड होत नसल्याने त्यावरील व्याज वाढत गेले व ही संस्था डबघाईस आली. त्यामुळे या संस्थेवर प्रशासक नियुक्त करण्यात आले होते. आता मात्र प्रशासक असलेले मंगेशकुमार शहा यांच्याकडे दोन पदभार असल्याने त्यांनी काम पाहणे शक्य नसल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांची प्रशासकीय कारणास्तवर नियुक्ती रद्द करण्यात येऊन या संस्थेवर नवीन प्रशासकांची जिल्हा उपनिबंधकांनी नियुक्ती केली.
यात ज्या संचालकांनी जिल्हा बँकेची कर्जफेड केली नाही, त्याच थकबाकीदार संचालक मंडळातील चार संचालकांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली गेली आहे. ही संस्था पुन्हा नावारूपाला आणू, यासाठी आम्हाला प्रशासक म्हणून संधी मिळावी, अशी त्यांनी मागणी केली होती. असे असले तरी ज्यांनी कर्ज थकविले व संस्था डबघाईस आली, अशा संचालकांकडेच पुन्हा संस्थेची सूत्रे सोपविली गेली आहे.
जप्तीची कारवाई सुरू
संस्थेने जिल्हा बँकेकडून घेतलेल्या आठ कोटींच्या कर्जाची थकबाकी वाढत जाऊन ती ३३ कोटी ८५ लाख ६६ हजार रुपयांवर पोहचल्याने बँकेने जप्तीची कार्यवाही सुरू केली आहे. यात सहकार न्यायालयाकडील दावा (क्रमांक जे -२४९/२०१०, दि. ३० एप्रिल २०१९) व निकालाच्या (क्र. १०२, दि. २० डिसेंबर २०१९) निर्णय व अनुषंगाने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमानुसार श्री महावीर अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी थकबाकीदार संस्था व संचालक मंडळ यांच्याकडून ३३ कोटी ८५ लाख ६६ हजार रुपयांची थकबाकी वसुलीसाठी स्थावर जप्ती व विक्री करण्याबाबत कार्यवाही जिल्हा बँकेने सुरू केली आहे.
मालमत्ता जप्त, विक्री न करण्याचे आदेश
थकबाकीदार संस्थेची स्थावर मालमत्ता, तत्कालीन चेअरमन, संचालक सदस्य यांची स्थावर मालमत्ता जप्त करीत असून सदर मालमत्तेत बदल केल्यास, तिचा ताबा दिल्यास, त्यावर टाच, बोजा चढविल्यास तो रद्दबातल व निष्फळ ठरेल, असे जिल्हा बँकेचे वसुली-विक्री अधिकारी किरण भास्कर पाटील यांनी जाहीर नोटीसद्वारे म्हटले आहे.
दरम्यान, थकबाकीविषयी नोटीस देऊनही भरणा झाला नसला तरी हा भरणा करणार असल्याचा प्रस्ताव संस्थेने पाठविला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
जळगावात आल्यानंतर माहिती देऊ
या विषयी सहायक प्रशासक व तत्कालीन संचालक मनीष जैन यांना या विषयी विचारणा केली असता आपण बाहेरगावी असून जळगावात आल्यानंतर माहिती देऊ, असे त्यांनी सांगितले. तर मुख्य प्रशासक म्हणून नियुक्त केलेले सुरेंद्र लुंकड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.