शवविच्छेदन न करता अंत्यसंस्काराचा प्रयत्न : पती व पत्नीत झाला होता मध्यरात्री वाद
शिरसोली, दि.13-कौटुंबिक कारणावरून झालेल्या वादाच्या घटनेत शिरसोली (ता.जळगाव) येथील महिलेचा बुधवारी मध्यरात्री मृत्यू झाला. या महिलेचे शवविच्छेदन न करताच अंत्यसंस्कार करण्याच्या प्रयत्नात असलेल्या नातेवाईकांना एमआयडीसी पोलिसांनी स्मशानभूमीतच रोखल्याची घटना बुधवारी सकाळी घडली.
जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील जि.प.मराठी शाळेजवळ भटक्या कुटुंबाची घरे आहेत. बुधवारी मध्यरात्री एका कुटुंबातील पती व पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. रात्रीच्या वेळी अंधार असल्याने हाणामारीत महिलेला जबर मार बसला. त्यानंतर कुटुंबातील अन्य सदस्यांनी या महिलेला गावातीलच एका रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र या महिलेला जबर मार बसलेला असल्याने डॉक्टरांनी जखमी महिलेला पुढील उपचारासाठी जळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. या दरम्यान, रात्री या महिलेचा मृत्यू झाला.
महिलेच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी गुरुवारी सकाळी अंत्यसंस्काराची तयारी केली. ही बाब एमआयडीसी पोलिसांना समजली. महिलेचे शवविच्छेदन न करता अंत्यसंस्कार करण्याच्या प्रयत्नात असलेल्या नातेवाईकांना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत थांबविले आहे. या महिलेचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला असून पुढील प्रक्रिया असल्याचे आमचे शिरसोली वार्ताहर कळवितात. (वार्ताहर)