लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : हळदीच्या कार्यक्रमात पिस्तूल घेऊन नाचण्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणा-या नवरदेवासह सुमारे १५ ते २० जणांविरूध्द शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चार ते पाच जणांना ताब्यात घेतले आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने लग्नसमारंभांसाठीदेखील मर्यादा आखून दिल्या आहेत. तसेच लग्नासाठी केवळ २५ जणांना परवानगी दिलेली आहे. मात्र नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. शहरासह जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले असून शहरातील कानळदा रोडवरील धनाजी काळे नगरात गणेश महाजन या तरुणाचा विवाह होता. १९ मे रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास त्याने हळदीच्या कार्यक्रमात घरगुती साऊंड सिस्टीम लावला व १५ ते २० जण नाचत होते. या कार्यक्रमाचा व्हिडीओ नवरदेवाने सोशल मिडीयावर व्हायरल केला होता.
व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांची कारवाई
हळदीच्या कार्यक्रमातील नाचगाण्याचा व्हिडीओ व्हायरल होताच शहर पोलिस ठाण्याचे अक्रम शेख, भास्कर ठाकरे, रतनहरी गिते, प्रणेश ठाकूर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर चौकशी केली, असता हळदीच्या कार्यक्रमात गर्दी असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली.
नवरदेवासह १५ ते २० जणांवर गुन्हा
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदी व जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. परंतु लग्न सोहळ्यात बेकायदेशीररित्या जमाव जमविणाऱ्या नवरदेवासह १५ ते २० जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी चार ते पाच जणांना ताब्यात घेतले आहे.