चाळीसगाव - माजी सैनिक सोनू हिम्मत महाजन यांच्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी आमदार उन्मेष पाटील यांचेसह ९ जणांविरुध्द चाळीसगाव शहर पोलिसात मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने पोलिसांना आदेश दिले होते. त्यानंतर ८ दिवसानंतर हा गुन्हा दाखल झाला.२ जुन २०१६ रोजी सायंकाळी ५ वाजता पोलिसांकडे आमच्या विरोधात तक्रार करतो या कारणावरून माजी सैनिक सोनू महाजन यांना शिवीगाळ व मारहाण केली होती. आमदार उन्मेष पाटील यांनी भावेश कोठावदे याला सोनू महाजन यांना मारण्यासाठी चिथावणी दिल्यानंतर त्याने तलवारीने सोनू महाजन यांच्या डोक्यावर वार करुन गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादी मनिषा महाजन यांनाही मारहाण करीत त्यांच्या डाव्या व उजव्या खांद्याला भारती कोठावदे यांनी चावा घेतला. त्यानंतर लक्ष्मीबाई कोठावदे हिने मनिषा महाजन यांच्या गळ्यातील १४ ग्रॅम वजनाची ३३ हजार २०० रुपये किंमतीची सोन्याची पोत काढून घेतली. मुकूंद कोठावदे याने सोनू महाजन यांच्या खिश्यातील २७०० रुपये तर बबड्या शेख व भूषण बोरसे याने २५ हजार रुपये किंमतीचे दुचाकी चोरुन नेली होती. याप्रकरणी मनिषा सोनू महाजन यांच्या फिर्यादीवरून मुकूंद भानूदास कोठावदे, भावेश मुकूंद कोठावदे, भारती मुकुंद कोठावदे, पप्पु मुकुंद कोठावदे, लक्ष्मीबाई भानुदास कोठावदे, बबड्या शेख, भुषण उर्फ शुभम बोरसे, जितेंद्र वाघ, आमदार उन्मेष पाटील यांचे विरुध्द भा.दं.वि.कलम ३०७,३९५,३२४,१४३,१४७,१४८,१४९,५०४,५०६ सह आर्म अॅक्ट ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.मनिषा महाजन यांनी औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार ३० एप्रिल रोजी चाळीसगाव शहर पोलिसात तक्रार दिली होती. पोलिसांनी फिर्यादी व साक्षीदारांचे जाबजबाब घेतले. अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव व पोलीस उपअधीक्षक नजिर शेख यांच्याकडेही दोघांची चौकशी झाली होती. पोलिसांनी या संदर्भात जिल्हा सरकारी वकील यांचे मार्गदर्शन घेतले. त्यानंतर ८ दिवसानंतर हा गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड तपास करीत आहे.
आमदार उन्मेष पाटील यांच्यासह ९ जणांविरुध्द गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2019 8:37 PM